Health Policy : कोरोनानंतर लोक आरोग्यबाबत जास्तच जागृत झाले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. सध्या कोणाला कधी काय होईल याची काही शाश्वती नाही. पूर्वी लठ्ठ किंवा वयस्क लोकांमध्ये असणारे हृदयविकार आता तरुण सोडा अगदी लहान मुलांमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लोक आता आवर्जुन आरोग्य विमा (Health Policy) उतरवत आहे. मात्र, आपण किती रुपयांचा कव्हर घ्यावा? हे अनेकांना आजही समजत नाही. वास्तविक, एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य पॉलिसीची कव्हर रक्कम अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये व्यक्तीचे आरोग्य, आर्थिक स्थिती, वय, जीवनशैली इत्यादींचा समावेश होतो. तुमच्याकडे आधीच आरोग्य विमा असल्यास, त्याचे कव्हर पुरेसे आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. हे कसं तपासायचं ते आज आपण पाहुयात.
आरोग्य समस्या?
एखाद्या व्यक्तीकडे किती रुपयांचा आरोग्य विमा संरक्षण असावे हे त्याच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते. जर तुम्ही तरुण असाल, तंदुरुस्त असाल आणि तुम्हाला कोणतीही आरोग्य समस्या नसेल तर तुम्ही बेसिक कव्हरसह योजना घेऊ शकता. याउलट, जर तुमची प्रकृती चांगली नसेल आणि तुम्हाला विशेष आरोग्य सेवेची गरज असेल, तर तुम्हाला सर्वसमावेशक आरोग्य विमा घेणे कधीही चांगले.
तुमची आर्थिक परिस्थिती
आरोग्य विम्याचा हप्ता खूप जास्त असतो. हा हप्ता भरताना तुमचं आर्थिक गणित कोलमडणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त कव्हर असलेल्या विम्याचा हप्ताही तुलनेत जास्त असतो. त्यामुळे आर्थिक परस्थिती चांगली नसेल तर नसण्यापेक्षा कमी कव्हर असलेला विमा तुम्ही उतरवू शकता. आरोग्य पॉलिसी घेण्यापूर्वी, तुम्ही किती प्रीमियम सहज भरू शकता ते तपासा. काही सामान्य विमा कंपन्या दर महिन्यालाही सुलभ हप्त्यात पैसे घेतात.
वय आणि जीवनशैलीकडे दुर्लक्ष करू नका
वय आणि जीवनशैलीनुसार तुमच्यासाठी किती कव्हर असलेला आरोग्य विमा योग्य राहील हे अवलंबून असते. कमी कव्हर असलेली पॉलिसी तरुणांसाठीही चांगली आहे. परंतु, तुमचे वय जास्त असल्यास तुम्ही अधिक कव्हर असलेली पॉलिसी घ्यावी. जर तुम्ही असे काम करत असाल जिथे इजा होण्याचा धोका असेल, तर तुमच्या पॉलिसीमध्ये जास्त कव्हर असावे. उदाहरणार्थ, खेळात गुंतलेल्या लोकांसाठी अधिक कव्हर असलेली आरोग्य पॉलिसी आवश्यक आहे.
कौटुंबाचा आरोग्य इतिहास
असे अनेक रोग आहेत जे अनुवांशिक आहेत. मधुमेह, बीपी ही त्याची उदाहरणे आहेत. जर एखाद्या व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास असा असेल की आई-वडील, आजी-आजोबा, यांना बीपी, डायबिटीज सारखे आजार असतील तर तुम्हाला या आजारांचा त्रास होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत अधिक कव्हर असलेली आरोग्य पॉलिसी आवश्यक आहे.
वैद्यकीय महागाई विचारात घ्या
वैद्यकीय महागाई खूप जास्त आहे. यामुळे, आरोग्य सेवांच्या किंमती दरवर्षी लक्षणीय वाढतात. याचा अर्थ आज कोणत्याही आजारावर उपचार किंवा शस्त्रक्रियेचा खर्च ५ लाख रुपये असेल तर तो पुढील वर्षी ६ लाख रुपये होऊ शकतो. त्यामुळे हेल्थ पॉलिसी घेताना एक किंवा दोन वर्षांनी गरज पडल्यास त्याचे कव्हर अपुरे पडू नये हे लक्षात ठेवा.