Join us  

Credit Card चा वापर किती करावा, जेणेकरून Cibil वर परिणाम होणार नाही; एक चूक पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:22 AM

आजच्या काळात क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर खूप वाढला आहे. आता प्रत्येक लहान-मोठ्या व्यवहारात क्रेडिट कार्डचा वापर सुरू झाला आहे. 

आजच्या काळात क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर खूप वाढला आहे. क्रेडिट कार्ड फक्त शहरातल्या लोकांपर्यंत मर्यादित राहिलं नसून ग्रामीण भागातही त्याचा अधिक वापर सुरू झाला आहे. पूर्वी लोक मोठ्या व्यवहारांसाठी किंवा कोणत्याही डीलसाठी क्रेडिट कार्ड वापरत असत, परंतु आता प्रत्येक लहान-मोठ्या व्यवहारात क्रेडिट कार्डचा वापर सुरू झाला आहे. क्रेडिट कार्ड व्यवहार केल्याने, तुम्हाला काही रिवॉर्ड पॉइंट (Reward Points) मिळतात, ज्याचा वापर करून तुम्ही काही कॅशबॅक (Cashback) मिळवू शकता किंवा शॉपिंग व्हाउचर मिळवू शकता. यामुळेच लोक क्रेडिट कार्डचा अधिकाधिक वापर करतात. काही लोक त्यांचं क्रेडिट कार्डचं संपूर्ण लिमिटही संपवतात. क्रेडिट कार्ड लिमिट किती वापरलं पाहिजे ते पाहू जेणेकरून तुमच्या सिबिल स्कोअरवर (CIBIL) परिणाम होणार नाही.

काय असतं क्रेडिट लिमिट?क्रेडिट कार्ड हे एकप्रकारचं लोनच असतं. म्हणजे तुम्ही बँकेकडून पैसे घेऊन ते खर्च करता आणि नंतर ते फेडता. प्रत्येक क्रेडिट कार्डावर तुम्हाला क्रेडिट स्कोअरनुसार एक लिमिट दिलं जातं. त्या लिमिटपेक्षा तुम्ही अधिक वापर करू शकत नाही.जरी तुम्हाला क्रेडिट कार्डाला एक निश्चित लिमिट दिलं असेल, परंतु त्याचा पूर्ण वापर टाळला पाहिजे. असं करणाऱ्या ग्राहकांना बँक रिस्की ग्राहक मानते. संबंधित ग्राहक कर्जावर पूर्णपणे अवलंबून असल्याचं बँकेला वाटतं. जर तुम्ही दर महिन्याला अधिक क्रेडिट लिमिट वापरत असाल तर अशा स्थितीत बँका तुमचं क्रेडिट लिमिट वाढवतात. परंतु जोपर्यंत लिमिट वाढत नाही, तोपर्यंत तुमच्या सिबिलवर त्याचा परिणाम होत राहतो.

क्रेडिट युटिलायझेशन रेश्योचांगल्या क्रेडिट स्कोअरसाठी, तुम्ही तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो म्हणजेच CUR सुमारे ३०-४० टक्के ठेवावा. जर तो ५० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर त्याकडे नकारात्मकतेनं पाहिलं जातं. अशा परिस्थितीत तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते किंवा कर्जावर जास्त व्याज द्यावं लागू शकतं. जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेश्योदेखील पाहिला जातो.

कसा मोजाल सीयुआर?क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो म्हणजेच सीयुआर मोजण्यासाठी क्रेडिट कार्डची एकूण देय रक्कम एकूण कार्डच्या लिमिटनं विभागा. त्यानंतर आलेल्या संख्येला १०० ने गुणा. या सूत्राद्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या क्रेडिट युटिलायझेशन रेश्योची गणना करू शकता.

टॅग्स :बँकपैसा