लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावल्यानंतर अन्नपदार्थांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. रोज लागणारे पीठ, डाळ, तांदूळ आणि साखर यांच्या किमतींत वाढ पाहायला मिळाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा खिसा दिवसेंदिवस रिकामा होत आहे.
व्यापारी म्हणाले की, सामान्यत: सध्या सुरू असलेल्या पावसामुळे डाळ, साखर, तांदूळ यांच्या किमतींत वाढ होते. मात्र आता जीएसटी लावल्याने आणि त्यानंतर मूळ किमतीत वाढ केल्याने वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. १८ जुलैनंतर जीएसटीचा बोझा वाढल्यानंतर दुग्ध उत्पादनांच्या किमतींत वाढ झाली आहे. पिठाच्या किमतीत जीएसटी वगळून प्रति किलो दोन रुपयांची वाढ झाली आहे. याचवेळी तांदूळ पाच ते १५ रुपयांनी महागले असून, डाळींच्या किमतीत २० रुपयांनी वाढ झाली आहे. याच कारणांमुळे सामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होण्यास सुरुवात झाली आहे.
कंपन्यांनीही दिला दणका
जेव्हा कोणतीही कंपनी महाग कच्चा माल खरेदी करेल तर त्याचा थेट परिणाम किमतीवर पडेल. जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर किमती वाढल्या आहेत. आता डाळ, साखर, तांदूळ महाग होत आहेत. आता काही कंपन्यांनी मूळ किंमत वाढवली असल्याने किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
प्रत्येक महिन्याला खिसा किती रिकामा?
जुलै महिन्यात प्रत्येक कुटुंबावर १२०० ते १४०० रुपयांचा बोझा वाढला आहे. पहिल्यांदा जीएसटी लावल्यानंतर किंमत वाढविण्यात आली, त्यानंतर आता उत्पादनांच्या मूळ किमतींमध्ये वाढ केल्यानंतर किमतीमध्ये वाढ झाली आहे.