रेल्वेनं सुरू केलेल्या वंदे भारत ट्रेन्सना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परंतु आता एक मोठी बाब समोर आलीये. रेल्वे मंत्रालय वंदे भारत ट्रेन्सच्या कमाईचे वेगळे रेकॉर्ड ठेवत नाही. आरटीआय कायद्यांतर्गत दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरातून यासंदर्भातील माहित समोर आलीये. मध्य प्रदेशातील रहिवासी चंद्रशेखर गौर यांनी, गेल्या दोन वर्षांत वंदे भारत ट्रेन्समधून रेल्वे मंत्रालयाला किती महसूल मिळाला आणि त्यांच्या ऑपरेशनमधून काही नफा किंवा तोटा झाला का याबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली होती.
ट्रेनच्या हिशोबानं महसूलाचा रेकॉर्ड ठेवला जात नसल्याचं रेल्वे मंत्रालयानं आपल्या उत्तरात सांगितलं. वंदे भारत ही देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन आहे, जिला १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली आणि वाराणसी दरम्यान हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आज १०२ वंदे भारत ट्रेन २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २८४ जिल्ह्यांमधून १०० मार्गांवर धावतात.
रेल्वेच्या आकडेवारीवर उपस्थित केले प्रश्न
वंदे भारत ट्रेनने आतापर्यंत दोन कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की वंदे भारत ट्रेननं २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३१० वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याइतकं अंतर कापलं आहे. "रेल्वे वंदे भारत ट्रेननं प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या आणि संबंधित गाड्यांनी कापलेलं अंतर यांची नोंद ठेवते, परंतु महसूल उत्पन्नासंदर्भातील सर्वात महत्त्वाची माहिती ठेवत नाही," असं म्हणत गौर यांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.
वेगळे रेकॉर्ड ठेवावे
रेल्वे अधिकारी वंदे भारत ट्रेननं एका वर्षात कापलेलं अंतर पृथ्वीभोवतीच्या एकूण परिक्रमांच्या संख्येइतकं काढू शकतात, परंतु या ट्रेनच्या माध्यमातून जमा झालेल्या एकूण महसुलाची माहिती त्यांच्याकडे नाही. वंदे भारत गाड्यांच्या महसुलाच्या स्थितीची वेगळी नोंद ठेवणं रेल्वेसाठी खूप महत्वाचे आहे कारण या भारतातील पहिल्या सेमी-हाय स्पीड न्यू जनरेशन गाड्या आहेत आणि त्यांचा नफा खरी लोकप्रियता मिळवून देऊ शकतो, असंही ते म्हणाले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दाखल केलेल्या आरटीआय अंतर्गत दुसऱ्या अर्जाला उत्तर देताना, रेल्वेनं वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण ९२ टक्क्यांहून अधिक जागा बुक केल्या जात असल्याचं सांगत हा उत्तम आकडा असल्याचं म्हटलं.