जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. विशेष न्यायालयाने शनिवारी त्यांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. ते तुरुंगातून बाहेर येतानाचे फोटो माध्यमांमध्ये आले. एकेकाळी आकाशाला गवसणी घालणारे नरेश गोयल यांना या फोटोंमध्ये ओळखताही येणं कठीण झालंय.
गोयल कॅनरा मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले आहेत. जेट एअरवेज ही एकेकाळी देशातील सर्वात मोठी विमान कंपनी होती परंतु सध्या ती बंद आहे. एकेकाळी मोठ्या उंचीवर असलेल्या नरेश गोयल यांची अशी अवस्था का झाली? त्यांच्या आकाशापासून जमीनीवर येण्याची गोष्ट आपण जाणून घेऊ.
अशी झाली सुरुवात
नरेश गोयल १९६७ मध्ये पटियालाहून दिल्लीत आले, तेव्हा ते अवघ्या १८ वर्षांचे होते. त्यांच्या खिशात पैसेही नव्हते आणि कुटुंब गंभीर आर्थिक संकटातून जात होतं. दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागायचा. गोयल यांना आपल्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढायचं होतं. त्यांचे मामेभाऊ चालवत असलेल्या कॅनॉट प्लेसमधील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये त्यांनी काम करायला सुरूवात केली. गोयल यांना येथे महिन्याला ३०० रुपये पगार मिळत होता. तिथे त्यांनी ट्रॅव्हल एजन्सीची कला आत्मसात केली. हळूहळू त्यांनी ट्रॅव्हल इंडस्ट्रीत आपला पाय रोवायला सुरुवात केली.
स्वत:चा व्यवसाय
फक्त चार वर्षांनंतर, १९७३ मध्ये नरेश गोयल यांनी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी उघडली आणि त्याला जेट एअर असं नाव दिलं. तेव्हा त्यांनी एका विमान कंपनीसारखं नाव ठेवण्याचं म्हणत अनेक जण त्यांची खिल्ली उडवत होते. नक्कीच एक दिवस आपली विमान कंपनी सुरू करू असं ते त्यांना म्हणायचे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर तो दिवस आला जेव्हा त्यांनी स्वतःची विमान कंपनी सुरू केली.
आकाशातून जमिनीवर
नरेश गोयल यांनी १९९१ मध्ये एअर टॅक्सीच्या रुपात जेट एअरवेजची सुरुवात केली. वर्षभरात त्यांनी चार विमानांचा ताफा तयार केला आणि जेट विमानांचे पहिले उड्डाण सुरू झाले. २००७ मध्ये एअर सहारा ताब्यात घेतली आणि २०१० पर्यंत जेट एअरवेज देशातील सर्वात मोठी विमान कंपनी बनली. पण लवकरच कंपनी समोरील संकटं वाढू लागली. मार्च २०१९ मध्ये त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावं लागले आणि त्याच वर्षी जेट एअरवेजचे कामकाजही बंद झालं.
ईडीची कारवाई
गोयल यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. गोयल आणि इतर अनेकांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली ते मुंबईपर्यंत त्यांच्या आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आणि त्यांच्या समस्या वाढतच गेल्या. कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून तपास यंत्रणेनं आता नवीन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नरेश गोयल याला अटक करण्यात आली आहे.
न्यायालयात झाले भावूक
अलीकडेच गोयल विशेष न्यायालयासमोर हजर झाले असताना ते अतिशय भावूक झाले होते. आपण जीवनातील प्रत्येक आशा सोडली आहे. अशा परिस्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगात मरणे माझ्यासाठी बरं होईल, असं त्यांनी सांगितलं. गोयल यांना सक्तवसूली संचालनालयाने गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी अटक केली होती आणि ते न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड तुरुंगात आहेत.