Join us

शेअर बाजार अजून किती वाढणार?

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 24, 2023 10:13 AM

वाढलेले बाजार अजून वाढणार का घसरणार?

डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

डिसेंबर महिन्यात शेअर बाजारात मोठी तेजी आली. निफ्टी आणि सेन्सेक्सने सर्वोच्चम पातळी गाठली. सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात हाच प्रश्न येत असेल की, ही तेजी अजून अशीच टिकून राहील का? जानेवारीत आणि पुढील महिन्यांत बाजार पुन्हा नवी उंची गाठेल का? फायद्यात असलेले शेअर विकून नफा वसूल करावा का? का अजून थोडी वाट पाहावी? बाजार खाली आला तर आज आहे तो नफाही गमावून बसू... असे एक ना अनेक प्रश्न आणि विचार अनेकांच्या मनात येत असतील. ते समजून घेऊया!

वाढलेले बाजार अजून वाढणार का घसरणार?

खरेदीने बाजार वाढतो आणि विक्रीने बाजार खाली येतो, हे अगदी सोपे सूत्र गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे. निफ्टी ५० मधील जे शेअर्स आहेत त्यातील खरेदी आणि विक्रीवर इंडेक्स ठरतो. सामान्य गुंतवणूकदारांवर बाजाराची दिशा ठरत नसते. परकीय संस्था, भारतीय मोठ्या गुंतवणूक संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांच्या विचारावर पुढील दिशा ठरेल. नफावसुली हा उद्देश राहिला तर येणाऱ्या काही दिवसांत बाजारात थोडे करेक्शन येऊ शकते. पण, गुंतवणुकीचा ओघ येणाऱ्या काही महिन्यांत असाच राहिला तर बाजार अजून तेजीत राहील.

का वाढत आहे शेअर बाजार?

पाच राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीन राज्यांत सरकार आले. ही निवडणूक ‘मिनी लोकसभा’ म्हणून मानली जाते. आगामी लोकसभा निवडणुकीत या निमित्ताने पुन्हा एकदा स्थिर सरकार येईल, असे गुंतवणूकदारांना वाटत असल्याने शेअर बाजारात गुंतवणूक वाढली. युद्धसदृश परिस्थिती शेअर बाजाराने पचविली आणि नवीन कोणतीही नकारात्मक परिस्थिती नसल्याने त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. इंधन दरही सध्या नीचांकी पातळीवर आहेत. परदेशी वित्तीय संस्थांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढविली. डिसेंबर महिन्यात तब्बल तीस हजार कोटी रुपये ‘कॅश मार्केट’मध्ये गुंतविले. यामुळे तेजीत भर पडली. ‘यूएस फेड’ने व्याजदरात वाढ केली जाणार नाही, असे स्पष्ट केल्याने भारतीय रिझर्व्ह बँकसुद्धा व्याजदर स्थिर ठेवेल या सकारात्मक अपेक्षेने बाजाराला तेजी. सकल राष्ट्रीय उत्पादन ज्यास जीडीपी असे म्हणतात ते येणाऱ्या काळात उत्तम राहील, असे भाकीत जागतिक स्तरावर केले गेल्याने बाजारात सकारात्मक वातावरण. 

टेक्निकल टूल काय सांगते?

आरएसआय हे टेक्निकल टूल बाजारातील खरेदीचा स्तर दर्शविते. साधारण आरएसआय ८० पर्यंत पोहोचला की बाजार ‘ओव्हरबॉट झोन’मध्ये गेला आहे, असे मानले जाते. सध्या निफ्टी ५० निर्देशांकाने हीच पातळी ७०च्या वर गाठली आहे. याचाच अर्थ बाजार ‘ओव्हरबॉट झोन’मध्ये पुन्हा जाण्याच्या तयारीत आहे. जगातील पातळीवर आणि भारतात जर परिस्थिती सकारात्मक असेल तर मात्र बाजारातील तेजी अशीच राहू शकते. परंतु,  नफा वसुली किंवा कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवली आणि जर ‘बेअर’ वृत्तीचा प्रभाव वाढला तर बाजार ‘करेक्शन’ घेईल.

लोकसभा निवडणूक हाच मोठा ट्रिगर 

भारतीय शेअर बाजारास आता आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भारतात पुन्हा एकदा स्थिर सरकार आले तर पुढील पाच वर्षे शेअर बाजारासाठी सर्वोत्तम अशीच राहतील. निवडणूक निकालावर हे अवलंबून राहील. निवडणूक निकाल बाजारासाठी अपेक्षित राहिले तर नफावसुली होऊन बाजार थोडे हलके होतील. पुढे सर्वत्र सकारात्मक परिस्थिती राहिली तर मात्र बाजार पुन्हा एकदा मोठ्या तेजीसाठी तयार राहतील. भारतात ज्या ‘सेक्टर्स’मध्ये सरकार विकास साध्य करू इच्छित आहे, अशा ‘सेक्टर्स’मधील शेअर्समध्ये तुफान खरेदी होईल, यात शंका नाही. चाणाक्ष गुंतवणूकदारांनी मात्र याकडे अधिक अभ्यासक वृत्तीने आणि गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार