Join us  

'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी मिळणार सर्वाधिक पगारवाढ; WTW चा रिपोर्ट प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 12:43 PM

Salary Hike : भारतात पुढील वर्षी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किती पगारवाढ मिळणार? डब्लूटीडब्लू या संस्थेने याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

Salary Hike : पगारवाढ हा नोकरदारांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एवढच काय प्रत्येक महिन्याच्या शेवटी "Your salary has been credited हा संदेश अनेकांना सुखावणारा असतो. तुम्हीही जर खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर पुढील वर्षी तुमची पगारवाढ किती होईल? याची माहिती आहे का? WTW नावाची संस्था या संदर्भात दरवर्षी अंदाज वर्तवत असते. WTW च्या वेतन बजेट नियोजन अहवालानुसार, २०२५ मध्ये भारतात सरासरी पगारवाढ ९.५ टक्के असेल असा अंदाज आहे. यामध्ये पुढील वर्षी, फार्मा क्षेत्रात जास्तीत जास्त १० टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे, तर उत्पादन क्षेत्रात ९.९ टक्के, विमा क्षेत्रात ९.७ टक्के आणि रिटेल क्षेत्रात ९.६ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

इतर देशांत काय स्थिती?सॉफ्टवेअर आणि व्यवसाय सेवा क्षेत्रातील वेतनवाढ २०२५ मध्ये केवळ ९ टक्के अपेक्षित आहे, जी सामान्य उद्योगाच्या सरासरी ९.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. या अहवालानुसार भारतीय कॉर्पोरेट जगत ९.५ टक्के पगारवाढीसह संपूर्ण क्षेत्रात आघाडीवर आहे. अहवालानुसार, त्यानंतर व्हिएतनाम ७.६ टक्के, इंडोनेशिया ६.५ टक्के, फिलीपिन्समध्ये ५.६ टक्के आणि चीन आणि थायलंडमध्ये ५-५ टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. हा रिपोर्ट डब्लूटीडब्लूच्या रिवार्ड्स डेटा इन्टेलिजेन्सने गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. हे सर्वेक्षण एप्रिल आणि जून २०२४ मध्ये करण्यात आले. हा रिपोर्ट जगभरातील १६८ देशांतील कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या अंदाजे ३२,००० नोंदींच्या आधारे तयार करण्यात आला आहे. भारतातूनही ७०९ लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता.

कामगिरीच्या आधारे वेतनवाढ देण्यावर भरभारतातील कंपन्या वाढीबाबत आशावादी आहेत. पण सावधगिरीही दाखवत आहेत. मोठ्या प्रमाणावर राजीनामा देण्याचा काळ आता मागे गेला आहे. आता कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही स्थिरता हवी आहे. कंपन्या कामगिरीच्या आधारे पगारवाढ देण्यावर अधिक भर देत आहेत. या ट्रेंडनुसार, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरासरी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा तिप्पट पगारवाढ मिळण्याची शक्यता असते, तर सरासरीपेक्षा चांगले काम कर्मचाऱ्यांना सरासरी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा १.2 पट पगारवाढ मिळण्याची शक्यता असते.

टॅग्स :नोकरीव्यवसायकर्मचारी