Wipro CEO Srinivas Pallia : विप्रोचे नवे सीईओ (Wipro CEO) श्रीनिवास पल्लिया यांना वार्षिक ६० लाख डॉलर (सुमारे ५० कोटी रुपये) मानधन मिळणार आहे. यात वेतन आणि इतर लाभांचा समावेश आहे. बंगळुरूतील या आयटी कंपनीनं शेअर बाजाराला ही माहिती दिली. एप्रिलमध्ये थिअरी डेलापोर्ट यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर विप्रोनं पल्लिया यांची नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची घोषणा केली होती. गेल्या वर्षी विप्रोमध्ये डेलापोर्टे यांचं वार्षिक वेतन ८० कोटीरुपयांहून अधिक होतं.
पल्लिया यांचं मानधन वार्षिक ३५ लाख डॉलर्स ते ६० लाख डॉलर्स (मूळ वेतन, व्हेरिएबल पे च्या पातळीनुसार) दरम्यान असेल, असं विप्रोनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय. हे पॅकेज इतकं आहे की यामध्ये दोन प्रायव्हेट जेट येऊ शकतात. छोट्या आणि हलक्या स्वरूपाच्या प्रायव्हेट जेटची किंमत २० कोटी रुपये इतकी आहे.
लाँग टर्म बेनिफिट्सचाही समावेश
विप्रोनं पल्लिया यांना अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्स (एडीएस), रिस्ट्रिक्टेड शेअर युनिट (एडीएस आरएसयू) आणि एडीएस परफॉर्मन्स शेअर युनिट (एडीएस पीएसयू) या स्वरूपात लाँग टर्म इन्सेन्टिव्ह्स दिले आहे. ही रक्कम ४० लाख अमेरिकन डॉलर आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं माजी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक थिअरी डेलापोर्ट यांना रोख नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे. पल्लिया यांचा विप्रोसोबत सीईओ आणि एमडी म्हणून करार ७ एप्रिल २०२४ ते ६ एप्रिल २०२९ या पाच वर्षांसाठी झाला आहे.