Join us  

TATA, अंबानींसारख्या देशातील बड्या कंपन्या किती टॅक्स भरतात? वाचा ‘ही’ यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 3:59 PM

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज देशात नंबर वन आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी करदात्यांपैकी एक आहे

मुंबई – इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची मुदत संपलेली आहे. आता तुम्हाला आयटीआर फाईल करायचा असेल तर दंड भरावा लागेल. यंदा ६ कोटीहून अधिक लोकांनी टॅक्स रिटर्न फाईल केला आहे. परंतु देशातील बड्या कंपन्या ज्यात मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा ग्रुप, जिंदाल आणि इतर कंपन्या सरकारला किती टॅक्स भरतात याची माहिती जाणून घेऊया.

टाटाच्या २ दिग्गज कंपन्याचे नाव यात आघाडीवर आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा स्टील. Cleartax अहवालानुसार, TCS ने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ११५३६ कोटी रुपयांचा कर भरला, जो कंपनीच्या एकूण महसुलाच्या ६.८ टक्के आहे. हेच टाटा स्टील आपल्या उलाढालीच्या ८.४ टक्के कर सरकारला देते, जे एकूण ११०७९ कोटी रुपये आहे. ते ऑटोमोटिव्ह स्टील, हॉट आणि कोल्ड रोल्ड शीट्स यासारख्या सेवा देतात.

जिंदाल कंपनीनं भरला ८ हजार कोटी कर

जिंदाल ग्रुपच्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने २०२२ मध्ये भारत सरकारला ८ हजार १३ कोटी कर दिला आहे. जो त्यांच्या एकूण महसूलाच्या ६.६ टक्के आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने २०२२ मध्ये जवळपास ७ हजार ९०२ कोटी रुपये टॅक्स भरला आहे. जे एकूण महसूलाच्या २.९ टक्के इतका आहे.

मुकेश अंबानींची रिलायन्स कंपनी टाटाच्या एक पाऊल मागे

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज देशात नंबर वन आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी करदात्यांपैकी एक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारत सरकारला ७७०२ कोटी रुपये कर भरला, जे त्यांच्या एकूण महसुलाच्या १.६५ टक्के आहे.

तेल कंपनीने ७५४९ कोटींचा कर भरला

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, देशातील मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक, भारतातील एक पेट्रोलियम कंपनी आहे, ज्यांनी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ७५४९ कोटी रुपयांचा कर भरला आहे. कंपनी भारतात डिझेल आणि पेट्रोल विक्री करते. कंपनीची स्थापना १९५९ मध्ये झाली. दुसरीकडे, भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसने २०२२ मध्ये ७२६० कोटी रुपयांचा कर भरला, जो कंपनीच्या महसुलाच्या ६.७ टक्के इतका आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, एआय आणि ऑटोमेशन आणि डेटा अॅनालिटिक्स यासारख्या सेवा पुरवते.

ITC ने ४७७१ कोटी कर भरला

ITC लिमिटेडची स्थापना १९१० मध्ये झाली आणि तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. कंपनी खाद्य पदार्थ, सिगारेट आणि सिगार, कागद, पर्सनल केअर आणि स्टेशनरी यांसारखी उत्पादने तयार करते. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ITC ने ४७७१ कोटी रुपयांचा कर भरला होता, जो महसुलाच्या ७.६ टक्के आहे.

टॅग्स :टाटाइन्कम टॅक्सरिलायन्स