नवी दिल्ली - देशभरात सोशल मीडियात आपला प्रभाव आणि फॅन फॉलोईंग मिळविणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. बऱ्याच कंपन्यांनी प्रमोशन किंवा ब्रँड एंडोर्समेंटसाठी सोशल मीडियात चांगले फॉलोअर्स असणाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. यामुळे सोशल मीडियामध्ये रील्स बनविणारे, तसेच इन्फ्लुएन्सर्सना कमाईचा चांगला पर्याय मिळाला आहे. परंतु, यातून मिळणारे उत्पन्न करमुक्त नाही. इतर स्वयंरोजगार करणाऱ्या उद्योजकाप्रमाणेच या व्यक्तींनाही कर भरावा लागतो. त्यामुळे या क्षेत्राकडे आर्थिक कमाईचे साधन म्हणून पाहणाऱ्यांनी करविषयक हे नियम समजून घेतले पाहिजेत.
आयकराव्यतिरिक्त इन्फ्लुएन्सर्सना जीएसटीदेखील भरावा लागू शकतो. वार्षिक उत्पन्न २० लाखांपेक्षा अधिक असल्यास त्यांना १८ टक्के जीएसटी भरावा लागतो. जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणीही करावी लागते. ते जीएसटी भरण्यास पात्र असतात.इन्फ्लुएन्सर्सना देत असलेला सल्ला, प्रशिक्षण, आदी सेवांसाठी घेतलेल्या मूल्यावरही जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे वजावटीचा लाभ घेण्यासाठी आणि कर दायित्व कमी करण्यासाठी या व्यक्तींनी खर्चाच्या नोंदी नेमकेपणाने ठेवल्या पाहिजेत.
कितीही मोठे असला, तरीही कारवाई होणारच- सोशल मीडियात प्रभाव निर्माण करणारेही स्वयंरोजगार श्रेणीत येतात. त्यांनाही स्वयंरोजगार करदात्यांप्रमाणेच कर भरावे लागतात. त्यांनाही आयटीआर भरताना प्रायोजित पोस्ट, ब्रँड एंडोर्समेंट आणि उत्पादनांच्या प्रमोशनमधून मिळणारे उत्पन्न दाखवावे लागते. - कर चुकविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. अनेक इन्फ्लुएन्सर्स हा कर बुडवित असतात. ही मंडळी समाजात कितीही प्रभावशाली असली तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली जात असते.