नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात विविध बँकांतील जन-धन खात्यांमध्ये किती रक्कम जमा करण्यात आली, याची माहिती खुली करण्याचे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने रिझर्व्ह बँकेला दिले आहेत.वंचित समाज घटकांना बँकांशी जोडण्याच्या उद्देशाने आॅगस्ट २0१४ मध्ये प्रधानमंत्री जन-धन योजना सुरू झाली होती. ८ नोव्हेंबर २0१६ रोजी केलेल्या नोटाबंदीनंतर ही खाती खूप चर्चेत आली. कारण या खात्यांत मोठ्या प्रमाणात बाद नोटा जमा करण्यात आल्या होत्या. यंदाच्या एप्रिलअखेरीस जन-धन खात्यांत तब्बल ८0 हजार कोटी जमा होते. काळा पैसा पांढरा करण्यासाठी या जन-धन खात्यांचा वापर केल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचा आदेश महत्त्वाचा आहे.नोटाबंदीच्या काळात या खात्यांत नेमकी किती रक्कम जमा झाली, याची माहिती मागणारा अर्ज माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी रिझर्व्ह बँकेला सादर केला होता. परंतु, रिझर्व्ह बँकेने त्यांच्या अर्जावर कोणतेच उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी केंद्रीय माहिती आयोगासमोर याचिका दाखल केली होती. त्यावर माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांनी बँकेला माहिती देण्याचे आदेश दिले.किती नोटा बदलून दिल्या?भार्गव यांनी आदेशात म्हटले की, या खात्यांत नेमक्या किती रकमेच्या बाद नोटा जमा झाल्या याची माहिती बँकेने अर्जदारास द्यावी. ती उपलब्ध नसल्यास तसे प्रतिज्ञापत्र आयोगाला द्यावे. या काळात जुन्या नोटांच्या बदल्यात किती नव्या नोटा दिल्या तसेच बचत व चालू खात्यांत किती रक्कम जमा झाली, याची माहितीही अर्जदारास देण्यात यावी.
‘नोटाबंदी काळात जन-धन खात्यांत किती रक्कम जमा झाली?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 2:05 AM