Join us

रतन टाटांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटांची निवड कशी झाली? बोर्डाच्या बैठकीची Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 7:02 PM

Noel Tata Update : उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर २४ तासांच्या आतमध्ये टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष निवडण्यात आले आहेत. ही निवडही रतन टाटा यांनी दिलेल्या मूलमंत्रानुसार झाली आहे.

Noel Tata Update : उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्ष पदावर कोण बसणार? दिवंगत रतन टाटा यांच्या माणसाच्या आणि मानवतेच्या मूळ भावनेला धरून राहणारा उत्तराधिकारी कोण? असे प्रश्न उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारानंतर २४ तासांच्या आत त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला. यामागेही रतन टाटा यांनी दिलेला मूलमंत्रच कारणीभूत आहे. कीप मूव्हिंग अर्थात पुढे पुढे जा.

सर्वप्रथम रतन टाटा यांना श्रद्धांजलीरतन टाटा यांच्या निधनानंतर अतिशय गुप्तपणे शुक्रवारी, ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता टाटा ट्रस्ट बोर्डाची बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक बॉम्बे हाऊसमध्ये (टाटा ट्रस्ट ऑफिस) न ठेवता. मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर टॉवरच्या २६व्या मजल्यावर असलेल्या टाटा कार्यालयात बोलावण्यात आली होती. याठिकाणी मीडियासह कोणालाही प्रवेश नव्हता. या बैठकीला टाटा ट्रस्ट बोर्डाचे सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वप्रथम रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली सभेत मंडळाच्या सदस्यांनी रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला.

बैठकीत कोणकोण होते?

  • नोएल टाटा - रतन टाटा यांचे सावत्र भाऊ. ते टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नाहीत, तर ट्रेंट आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या बोर्डाचे अध्यक्ष आहेत.
  • जिमी एन टाटा - रतन टाटा यांचे धाकटा बंधू. वयस्क असून त्यांच्यावर जास्त जबाबदारी नाही.
  • वेणू श्रीनिवासन - टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष असून सुंदरम क्लेटन लिमिटेड आणि टीव्हीएस मोटर कंपनीचे मानद अध्यक्षही आहेत. ते टाटा सन्सच्या बोर्डावर देखील आहेत. टाटा सन्सच्या बोर्डावर टाटा ट्रस्टचे प्रतिनिधित्व करतात.
  • विजय सिंह - हे निवृत्त IAS अधिकारी असून टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत. ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून ते टाटा सन्सच्या संचालक मंडळावरही आहेत.
  • मेहली मिस्त्री : देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती. मिस्त्री ऑक्टोबर २०२२ मध्ये टाटा ट्रस्टमध्ये सहभागी झाले. ते एम पालोनजी ग्रुप ऑफ कंपनीज चालवतात. मिस्त्री हे रतन टाटा यांचे जवळचे विश्वासू मानले जात होते.
  • जहांगीर एच.सी - जहांगीर पुण्यातील व्यावसायिक जहांगीर हॉस्पिटल चालवतात. २०२२ मध्ये ते टाटा ट्रस्टमध्ये रुजू झाले.
  • डेरियस खंबाटा : मुंबईतील ज्येष्ठ वकील. खंबाटा हे मुंबईच्या कायदेशीर वर्तुळात प्रसिद्ध आहेत, त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये टाटांचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • प्रमित झावेरी : सिटी इंडियाचे माजी सीईओ, प्रमित बँकेतून निवृत्त झाल्यानंतर लगेचच टाटा ट्रस्टमध्ये सामील झाले.

वेणू श्रीनिवासन यांनी नोएल टाटा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडलाश्रद्धांजली सभेनंतर टाटा ट्रस्ट बोर्डाची बैठक सुरू झाली. टाटा ट्रस्टच्या नावाने रतन टाटा यांनी काय मागे सोडले याची माहिती देण्यात आली. टाटा ट्रस्ट बोर्डाची बैठक सुरू होण्यापूर्वी नोएल टाटा, डेरियस खंबाटा आणि मेहली मिस्त्री हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते. टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी नोएल हे टाटा पदाचे योग्य उत्तराधिकारी असल्याचे मत मांडले. यावर सर्वांनी एकमताने होकार दिला. टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. मार्च १९९१ पासून रतन टाटा टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते. बोर्ड सदस्यांनी नोएल टाटा यांना शुभेच्छा दिल्या. नोएल यांनी रतन टाटा यांच्यावर भावनिक भाषण केले आणि मोठी जबाबदारी स्वीकारून पुढे जाण्याचा संदेश दिला.

टॅग्स :नोएल टाटारतन टाटाटाटा