Join us

Debit Card : तुम्ही डेबिट कार्ड वापरता? मग घ्या 'ही' काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 3:00 PM

Debit Card : अलीकडच्या काळात डेबिट कार्डच्या माध्यमातून देवाण घेवाण करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे, कारण यातून फसवणुकीचे (Debit card fraud) प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.  

नवी दिल्ली : डेबिट कार्डमुळे (Debit card) आपले आर्थिक व्यवहार अतिशय सोपे आणि सुविधाजनक झाले आहेत. तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली किंवा सेवा घेतल्यानंतर डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही त्याचे पैसे मोजता. पैसे काढण्यासाठी बॅंकेत जाण्याची गरज भासत नाही. एटीएममधून (ATM) डेबिट कार्डाद्वारे चटकन पैसे काढता येतात. मात्र, अलीकडच्या काळात डेबिट कार्डच्या माध्यमातून देवाण घेवाण करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे, कारण यातून फसवणुकीचे (Debit card fraud) प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.  त्यामुळे ग्राहकांनी याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्यावेळी एखाद्या अनोळखी व्यक्तीला डेबिट कार्ड किंवा त्यासंबंधी डिटेल्स माहीत झाले, तर त्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा बाबतीत सतर्क असले पाहिजे.  

पिन, सीव्हीव्ही नंबर लक्षात ठेवापिन नंबर नेहमी लक्षात ठेवला पाहिजे आणि तो कोणाशीही शेअर करू नये. कोणतीही बँक तुम्हाला कोणत्याही कारणास्तव पिन मागत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. तसेच, डेबिट कार्डच्या सीव्हीव्ही (CVV) क्रमांक सुद्धा कोणासोबत शेअर करू नका.  CVV ही तीन अंकी संख्या आहे. डेबिट कार्डच्या मागील बाजूस जे डेबिट कार्डद्वारे केलेल्या ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाणीकरण करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे हा नंबर लक्षात ठेवा आणि शक्य असल्यास कार्डवर CVV नंबर लपवून ठेवा.

स्टेटमेंट चेक करा आणि संशयास्पद वाटले तर तक्रार कराकोणत्याही अपरिचित गतिविधीसाठी स्टेटमेंट चेक केले पाहिजे. कोणत्याही हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या कार्डची त्वरित तक्रार करा. या व्यतिरिक्त, ग्राहकांनी खात्री केली पाहिजे की, त्यांना व्यवहारांसाठी अलर्ट मिळाला आहे आणि ते पाहिल्यानंतर कोणत्याही संशयास्पद गतिविधीबद्दल त्यांनी बँकेला रिपोर्ट केला पाहिजे.

फक्त विश्वसनीय व्यापाऱ्यांकडे कार्डचा वापर कराग्राहकांनी आपले डेबिट कार्ड फक्त विश्वसनीय व्यापाऱ्यांकडेच वापरावे. तसेच, एखाद्या दुकानात कार्डद्वारे पेमेंट करताना त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे. याचबरोबर, एटीएम रूममध्ये कधीही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका, ग्राहकांनी एटीएम रूममध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेणे टाळावे आणि व्यवहार पूर्ण केल्यानंतर लगेचच आपले कार्ड आणि रक्कम सुरक्षित ठेवली पाहिजे. तसेच, सर्व पैसे एकाच ठिकाणी ठेवू नये.

टॅग्स :बँकव्यवसायसायबर क्राइम