Join us  

Recession In America: अमेरिकेत मंदी पण भारताला मोठी संधी! IT कंपन्यातील नोकरकपात ठरेल फायद्याची; कशी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:15 PM

Recession In America: अमेरिकेतील टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात होताना दिसून येत असून, याचा भारताला फायदा मिळू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Recession In America:अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा जगभरात सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक दिग्गज कंपन्या आतापासूनच नोकरकपात करत आहेत. गुगल आणि ॲमेझॉनने नवीन भरतीवर बंदी घातली आहे. ट्विटरनंतर, मेटामध्येही नोकरकपात होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींचा भारताला फायदा होणार असून, अमेरिकेतील मंदी भारतासाठी संधी ठरू शकते, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात होताना दिसून येत आहे. यासोबतच इतरही अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये लोकांना कामावरून काढले जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. आयटी तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यामुळे भारतासाठी चांगली संधी निर्माण होऊ शकते. यामुळे भारतीय टेक टॅलेंटसाठी येता काळ फायद्याचा ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकन कंपन्या प्रकल्प ऑपरेशन भारतात हलवू शकतात

अमेरिकेतील आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गमावल्याचा फायदा भारताला होऊ शकतो. कारण अनेक अमेरिकन कंपन्या त्यांचे प्रकल्प ऑपरेशन भारतात हलवू शकतात. विशेषत: या कंपन्या नावीन्यपूर्ण आणि संशोधन आणि विकासाशी संबंधित प्रकल्प भारतात आणू शकतात. यामुळे केवळ अमेरिकन कंपन्यांच्या खर्चात कपात होणार नाही, तर भारताला तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन व्यवसाय आणि नोकऱ्यांच्या संधीही मिळू शकतात, असे मतही आयटी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

भारताच्या टेक टॅलेंटला फायदा होईल 

अमेरिकेत गुगल आणि ॲमेझॉनने नवीन भरतीवर बंदी घातली आहे. याशिवाय लिफ्ट, स्ट्राइप या कंपन्यांमध्येही मोठी नोकरकपात सुरू आहे. नेटफ्लिक्समध्येही लोकांचा पगार कमी केल्याची चर्चा आहे. याचा फायदा भारताच्या टेक टॅलेंटला होईल आणि देशाला अपस्किलिंगमध्ये फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, भारतात, BYJU सारख्या अनेक टेक कंपन्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. जगभरातील मंदीचा भारतीय टेक कंपन्यांच्या ऑर्डर फ्लोवरही परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन कंपन्या कॉस्ट कटिंगसाठी भारताकडे वळू शकतात आणि यामुळे आयटी नोकरदारांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :अमेरिकाभारतनोकरी