Join us

'आयुष्यमान'अंतर्गत 18 लाख जणांनी घेतला 5 लाखांच्या आरोग्य विम्याचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 5:48 PM

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारतला जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे.

नवी दिल्लीः प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेअंतर्गत आयुष्यमान दिवस पाळण्यात येऊन या अंतर्गत लाभार्थ्यांची पडताळणी व माहिती संकलन मोहीम हाती घेण्यात आली. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारतला जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 18 लाख लोकांनी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार घेतले आहेत. आयुष्यमान भारत योजने(Ayushman Bharat Yojana)ची सरकार वेबसाइट https://www.pmjay.gov.in/ ही माहिती देण्यात आली आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार 3 एप्रिल 2019पर्यंत आयुष्यमान योजनेंतर्गत 18,35,227 लोकांनी लाभ मिळवला आहे. तसेच 2,89,63,698 E-CARDSचं वाटपही करण्यात आलं आहे.या योजनेशी आतापर्यंत 15,291 रुग्णालयं जोडली गेली आहेत.  देशभरातील 10 कोटी कुटुंबाना (50 कोटी लाभार्थी) आरोग्य संरक्षण पुरवण्याच्या सरकारच्या नियोजनाअंतर्गत आरोग्य हे देशातील धोरण व राजकीय परिसंवादाचा मुख्य टप्पा बनला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लाभार्थ्यांपर्यंत परिणामकारक पद्धतीनं पोहचणे आणि त्यांना योजनेच्या तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक राबवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिली पायरी म्हणून आयुष्यमान भारत दिवस आयोजित करण्यात आला. यामध्ये ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती जमा करण्यात आली.

  • प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्ष 5 लाखांचे आरोग्य विमा संरक्षण

लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रतिवर्ष रुपये 5 लाख आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. सदर योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही रुग्णालयात रुपये 5 लाखांपर्यंत विनामूल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.

टॅग्स :आयुष्मान भारतसरकारी योजना