Join us

UPI Payment : यूपीआय कितपत सुरक्षित आहे ? वापरण्यापूर्वी नक्की एकदा पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 5:23 PM

अलीकडच्या काळात यूपीआय (UPI) मोठ्या प्रमाणावर वापरले जाते आहे. ते वापरताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? 

अलीकडच्या काळात यूपीआय (UPI) मोठ्या प्रमाणावर वापरले जाते आहे. ते वापरताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही प्रणाली. या पद्धतीत एकापेक्षा अधिक बँक खात्यांना एकाच मोबाइल ॲपमध्ये जोडले जाते आणि  थेट हव्या त्या व्यक्तीला आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार पैसे दिले जाऊ शकतात. पैसे देण्यासाठी (पेमेंट) ऑनलाइन वापरायची ही पद्धत आहे.

सुरुवातीला अनेकांना या पद्धतीच्या वापराबाबत शंका होत्या. पण गेल्या तीन-चार वर्षांमध्ये भाजीबाजार आणि पानपट्टीच्या ठेल्यापासून मोठ्या मॉल्सपर्यंत अनेक ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करण्याच्या सुविधा पहायला मिळतात. तरीही साशंकता आहेच ! या पद्धतीत एकाच क्लिकच्या साहाय्याने टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन केले जाते आणि त्याद्वारे पैसे पाठवताना ग्राहकाचा  कार्ड क्रमांक, आयएफएससी कोड, खाते क्रमांक यासारखे तपशील प्रविष्ट करणे आवश्यक नसते. ही पद्धत वापरताना एखादे चांगले आणि पुरेशी सुरक्षा असणारे UPI ॲप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून घ्यावे लागते.

फोनपे, पेटीएम, भीम , मोबीक्वीक, गुगलपे, उबर, एसबीआयपे, बॉबपे यासारखी अनेक ॲप्स आज आपल्याला उपलब्ध आहेत. भीम या भारत सरकारच्या ॲपच्या पाठीशी शासकीय विश्वासार्हता आहे असे अनुभवाला येते. आपले जे खाते आपण या ॲपशी संलग्न करणार आहोत त्यामध्ये गरजेपेक्षा जास्त पैसे ठेवण्याचे आपण टाळू शकता. आपल्या मोबाइलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ज्यांची नावे आपण स्टोअर केलेली असतील आणि त्यांच्यातल्या ज्यांनी त्यांचे ते मोबाइल नंबर्स त्यांच्या [ कोणत्याही ] बँकेच्या खात्याशी जोडलेले असतील त्यांना आपण टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या सहाय्याने पैसे पाठवू शकता. सुरुवातीला आपल्याला लॉगइन व्हावे लागते आणि ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या खात्याशी जोडले गेलात की पैसे पाठविण्याची सूचना देऊन आपल्याला आपला कोड किंवा ऑथेंटिकेशन नंबर टाइप करावा लागतो. हे करण्यापूर्वी आपण निवडलेली व्यक्ती नेमकी ज्यांना पैसे पाठवायचे आहेत तीच आहे आणि ज्या खात्यावर आपण पैसे पाठवणार आहोत तेच नेमके तिचे खाते असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :ऑनलाइनपैसा