Join us

याला म्हणतात रिटर्न! दररोज केवळ २० रुपये गुंतवा अन् १० कोटी मिळवा; कसे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 8:51 PM

जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तितके रिटर्न चांगले मिळू शकतील. दररोज फक्त २० रुपये वाचवून तुम्ही करोडपती होऊ शकता.

नवी दिल्ली: प्रत्येक जण यथाशक्ती बचतीचे प्लान करत असतो आणि ते अमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो. पगार आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ साधून आपल्या, कुटुंबाच्या, मुलांच्या भविष्यासाठी सर्व जण काही ना काही गुंतवणूक करत असतात. मात्र, चांगले रिटर्न मिळण्यासाठी मोठीच गुंतवणूक करायला हवी, असे नाही. तुमची दृढ इच्छाशक्ती असेल, तर कमी गुंतवणुकीतही चांगला परतावा प्राप्त करू शकता. मात्र, त्यासाठी संयमाची गरज असल्याचे सांगितले जाते. 

मोठ्या रकमेने गुंतवणूक सुरू करणे आवश्यक नाही. तुम्ही दररोज किंवा दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवून मोठा निधी उभारू शकता. तुम्ही तुमची स्वप्ने सत्यात उतरवू शकता. तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता. त्यामुळे तुमचा जो काही पगार किंवा कमाई आहे, त्यात बचत करून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तितके रिटर्न चांगले मिळू शकतील. दररोज फक्त २० रुपये वाचवून तुम्ही करोडपती होऊ शकता. 

दररोज २० रुपये गुंतवा अन् १० कोटींपर्यंत परतावा मिळवा

तुम्ही नियमितपणे दररोज फक्त २० रुपये गुंतवल्यास, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कमाल १० कोटी रुपयांपर्यंत पैसे जमा करू शकता. हे पूर्णपणे शक्य आहे. आताच्या घडीला म्युच्युअल फंडाविषयी सर्वांना माहिती आहे. यामध्ये दर महिन्याला गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे दरमहा म्युच्युअल फंडात किमान रु ५०० गुंतवू शकता. म्युच्युअल फंडांनी दीर्घ मुदतीत चांगला परतावा दिला आहे आणि लोकांना करोडपती बनवले आहे. काही फंडांनी २० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

एसआयपीतून दमदार परतावा मिळून कोट्यधीश होण्याची संधी

जर २० वर्षांच्या तरुणाने दररोज २० रुपयांची बचत केली तर ही रक्कम एका महिन्यात ६०० रुपये होईल. ही रक्कम दरमहा म्युच्युअल फंडात SIP करणे आवश्यक आहे. ४० वर्षे म्हणजे ४८० महिने सलग २० रुपये जमा केल्यास १० कोटींहून अधिक रक्कम जमा होऊ शकते. या गुंतवणुकीवर सरासरी १५ टक्क्यांचा वार्षिक परतावा दिल्यास ४० वर्षांनंतर एकूण निधी १.८८ कोटी रुपये होतो. या ४० वर्षांमध्ये गुंतवणूकदार फक्त २,८८,००० रुपये जमा करतील. दुसरीकडे, महिन्याला ६०० रुपयांच्या SIP वर २० टक्के परतावा मिळत असेल, तर ४० वर्षांनंतर एकूण १०.२१ कोटी रुपये जमा होतील. 

दरम्यान, याशिवाय, जर २० वर्षांच्या तरुणाने दररोज ३० रुपये वाचवले, जे एका महिन्यात ९०० रुपये होतात. ही रक्कम एसआयपीद्वारे कोणत्याही वैविध्यपूर्ण म्युच्युअल फंडात गुंतवल्यास, आणि यावर ४० वर्षांनंतर १२ टक्के वार्षिक रिटर्ननुसार तुम्हाला १.०७ कोटी रुपये मिळतील. या दरम्यान ४,३२,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला ४० वर्षे गुंतवणूक करायची नसेल तर, मग तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम वाढवावी लागेल. २० वर्षांतही तुम्ही कोट्यधीश होऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, म्युच्युअल फंडामध्ये चक्रवाढ व्याज मिळाल्याने, अगदी लहान गुंतवणूक देखील एक मोठा दीर्घकालीन फंड बनते. तथापि, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना जोखीम असते. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घेणे उपयुक्त ठरू शकेल.  

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक