Join us

कसे भरावे कुटुंबाचे पोट?, खाद्य महागाई वाढली १२.३२ टक्क्यांनी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:11 AM

जुलैमध्ये अन्नधान्याची महागाई १२.३२ टक्क्यांवर पोहोचल्याने महानगरांमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती सरासरी १७.६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

नवी दिल्ली : टोमॅटो, बटाटे, कांदा, सर्व प्रकारच्या भाज्या आणि गहू, तांदळाच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. या वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागांच्या तुलनेत लहान शहरे, तसेच महानगरांमध्ये राहणाऱ्यांचे रोजचे जगणे जिकिरीचे बनले आहे. शहरांमध्ये संपूर्ण कुटुंबाचे पोट भरणे अवघड होऊन बसले आहे. 

जुलैमध्ये अन्नधान्याची महागाई १२.३२ टक्क्यांवर पोहोचल्याने महानगरांमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती सरासरी १७.६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे सरकारने काही दिवसांपूर्वी तांदळाच्या काही प्रकारांवर निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला. सरकारने चालू खरीप हंगामात ५२१ लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच भारतातही चांगल्या प्रमाणात पाऊस न पडल्याने शेती उत्पादनांना फटका बसला आहे. त्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. 

तांदूळ उत्पादन घटणार - यंदाही तांदळाचे उत्पादन ५ टक्क्यांनी घटण्याची भीती आहे. - यंदा तांदळाचे उत्पादन १०.४५ कोटी टन इतके होईल. एकूण उत्पादनात ५५ लाख टन इतकी घट होण्याचा अंदाज आहे. - भारतीय कृषी संधोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, आणि बिहार या तांदूळ उत्पादक पट्ट्यात कमी पाऊस झाल्याने उत्पादनात मोठी घट येऊ शकते. 

टॅग्स :महागाई