Join us

बँकांमधील 35 हजार कोटींची बेवारस रक्कम आरबीआयकडे सुपूर्द; यात तुमची तर नाही ना? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 2:54 PM

अनक्लेम्ड डिपॉझिट (Unclaimed deposits) ही अशा खात्यातील असते की, जे 10 वर्षांपेक्षा जास्त काळ ऑपरेट केले जात नाही. 

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या 10.24 कोटी खात्यांमध्ये फेब्रुवारी 2023 पर्यंत 35,012 कोटी रुपये जमा करण्यात आले होते, जे गेल्या 10 वर्षांपासून ऑपरेट करण्यात आले नाहीत. बँकांनी ही अनक्लेम्ड म्हणजेच दावा न केलेली रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) हस्तांतरित केली आहे. अनक्लेम्ड डिपॉझिट (Unclaimed deposits) ही अशा खात्यातील असते की, जे 10 वर्षांपेक्षा जास्त काळ ऑपरेट केले जात नाही. 

मार्च 2022 पर्यंत बँकांमध्ये 48,262 कोटी रुपये अनक्लेम्ड डिपॉझिटच्या स्वरूपात होते. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारतीय रिझर्व्ह बँक डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEAF) मध्ये अनक्लेम्ड डिपॉझिट ठेवते. फेब्रुवारी 2023 पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (SBI) 8,086 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडे 5,340 कोटी रुपये, कॅनरा बँकेकडे 4,558 कोटी रुपये आणि बँक ऑफ बडोदाकडे 3,904 कोटी रुपयांचे अनक्लेम्ड डिपॉझिट होते. 

भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, जर एखाद्या ग्राहकाने आपल्या खात्यातून 10 वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार केला नाही, तर त्या खात्यात जमा केलेली रक्कम अनक्लेम्ड (Unclaimed) होते. ज्या खात्यातून व्यवहार होत नाहीत ते खाते निष्क्रिय (Dormant account) होते. अनक्लेम्ड रक्कम बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव आणि आवर्ती ठेव खात्यात असू शकते. 

बँक खाते निष्क्रिय होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की खातेदार बँक खाते विसरणे किंवा खातेदाराचा मृत्यू, कुटुंबातील सदस्यांना मृताच्या खात्याबद्दल माहिती नसणे, चुकीचा पत्ता किंवा नॉमिनी खात्यात नोंदणीकृत नसणे. दरम्यान, अनक्लेम्ड डिपॉझिटची माहिती सहसा फक्त बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. ही माहिती खातेदाराच्या खात्यात पॅन कार्ड, जन्मतारीख, नाव आणि पत्ता यावरून मिळू शकते. सामान्य चौकशी आणि आवश्यक कागदपत्रे घेतल्यानंतर बँका निष्क्रिय खात्यात असलेली रक्कम व्याजासह परत करतात.

कसा करावा क्लेम?बँकेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे पुन्हा जमा केल्यानंतर खातेदाराला बँक खात्यात असलेली रक्कम काढता येते. जर खातेदाराचा मृत्यू झाला असेल, तर नॉमिनी व्यक्ती अनक्लेम्ड रकमेवर सहजपणे दावा करू शकतो. नॉमिनीला खातेधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागेल. यासोबतच त्याला त्याची केवायसी कागदपत्रेही द्यावी लागतील. संयुक्त खाते असल्यास, बँक मरण पावलेल्या खातेदाराचे नाव काढून टाकेल आणि हयात असलेल्या खातेदाराला सर्व अधिकार देईल.

टॅग्स :पैसाबँकभारतीय रिझर्व्ह बँक