वेगवेगळ्या कारणांमुळे लांबणीवर पडलेला LIC चा देशातील सर्वात मोठा IPO अखेर बाजारात दाखल होण्यास सज्ज झाला आहे. सरकारी विमा कंपनी असलेल्या LIC चा IPO रिटेल इन्वेस्टर्ससाठी ४ मे रोजी खुला होणार आहे आणि बिडिंगसाठी ९ मे पर्यंत सुरू राहणार आहे. एलआयसीच्या या मेगा आयपीओसाठी ९०२ रुपयांपासून ९४९ रुपये प्राइज बँड निश्चित करण्यात आला आहे. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १५ शेअर असणार आहेत.
आयपीओमध्ये किती मिळणार डिस्काऊंटकंपनीच्या बोर्डानं एलआयसी आयपीओमध्ये कर्मचाऱ्यांसाठी ४५ रुपये तर एलआयसी पॉलिसी धारकांसाठी ६० रुपयांचा डिस्काऊंट निश्चित केला आहे. अँकर इन्वेस्टर्ससाठी एलआयसी आयपीओ २ मे रोजी खुला होणार आहे. शेअर मार्केटमध्ये एलआयसी आयपीओची लिस्टिंग १७ मे रोजी होणार आहे. सरकारनं बाजाराची सध्याची परिस्थिती पाहून आयपीओचा साइज कमी केला आहे. सरकार आता एलआयसीमधील आपला ३.५ टक्के वाटा कमी करणार आहे. आयपीओच्या माध्यमातून सरकारनं २१ हजार कोटी रुपये जमा करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे. साइज कमी केल्यानंतर हा आयपीओ भारताच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.
लॅप्स झालेल्या पॉलिसीवरही मिळणार डिस्काऊंटजर तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी आहे. पण काही कारणास्तव ती लॅप्स झाली असेल तरीही तुम्हाला एलआयसीच्या आयपीओमध्ये डिस्काऊंटचा लाभ घेता येणार आहे. एलआयसीनं आयपीओ संदर्भातील एक FAQ मध्ये लोकांनी विचारलेल्या शंकांचं निरसन करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यातील माहितीनुसार पॉलिसी लॅप्स झाली असेल तरीही संबंधिताला आयपीओसाठी अप्लाय करता येणार आहे. एलआयसीच्या माहितीनुसार जर एखादी पॉलिसी मॅच्युर झालेली नसेल किंवा सरेंडर केली गेलेली नसेल, तसंच पॉलीसीधारकाचा मृत्यू झालेला नसेल. तरीही पॉलिसीधारकाना आयपीओमध्ये डिस्काऊंट मिळणार आहे.
लहान मुलांच्या पॉलिसीवरही मिळणार लाभ, पण...डिस्काऊंटची घोषणा झाल्यानंतर लोकांमध्ये अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहे. जसं की लहान मुलांच्या नावावर जर पॉलिसी असेल तर आयपीओमध्ये मिळणाऱ्या डिस्काऊंटचा लाभ मिळवता येणार की नाही? एलआयसीच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार मायनर पॉलीसीच्या प्रकरणात पॉलीसी प्रपोज करणाऱ्याला पॉलिसी ओनर ग्राह्य धरलं जाईल. अशापद्धतीनं ज्यांनी पॉलिसी प्रपोज केली आहे तेच पॉलिसी होल्डर आहेत. ते सर्व जण डिस्काऊंटसाठी पात्र ठरणार आहेत.
जॉइंट पॉलिसीमध्ये फक्त एकालाच सूटज्वाइंट पॉलिसी धारकांमध्ये केवळ एका व्यक्तीलाच एलआयसीच्या आयपीओमध्ये डिस्काऊंटचा लाभ मिळणार आहे. तर दुसरा व्यक्ती नॉर्मल रिटेल कॅटेगरीमध्ये अर्ज दाखल करु शकेल.
ग्रूप एलआयसी पॉलिसी धारकांना लाभ नाहीजर तुमच्याकडे एलआयसीची कोणतीही ग्रूप पॉलिसी असेल तर तुम्हाला डिस्काऊंटचा लाभ घेता येणार नाही. ग्रूप पॉलिसीहोल्डर्स आयपीओमध्ये रिझर्व्हेशनसाठी पात्र ठरणार नाहीत, असं आयपीओकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. म्हणजेच जर तुम्हाला कंपनीकडून एलआयसीची ग्रूप पॉलिसी मिळाली असेल तर त्याआधारे तुम्ही आयपीओमध्ये शेअर डिस्काऊंट प्राप्त करू शकणार नाही.
या पॉलिसी धारकांना नाही मिळणार लाभसरकारी विमा कंपनीनं स्पष्ट केलं आहे की देशातील सर्वात मोठ्या आयपीओमध्ये देण्यात येणारी सूट प्राप्त करण्यासाठी भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. जे पॉलिसी धारक एनआरआय आहेत किंवा भारतात वास्तव्याला नाहीत. त्यांना एलआयसीच्या आयपीओमध्ये रिझर्व्हेशन आणि डिस्काऊंटचा लाभ घेता येणार नाही. या दोन कॅटेगरी वगळून इतर सर्व पॉलिसी धारकांना डिस्काऊंटचा लाभ घेता येणार आहे.