रजा प्रवास भत्ता (एलटीए) कर्मचाऱ्याच्या वेतनात अथवा ‘कॉस्ट-टू-कंपनी’मध्ये (सीटीसी) समाविष्ट असेल, तर त्यावर जुन्या आयकर पद्धतीनुसार (ओल्ड रेजिम) कर सवलत मिळते. मात्र, ही सवलत मिळविण्यासाठी काही अटी व शर्तींची पूर्तता करावी लागते.
काय आहेत अटी व शर्ती?
स्वत: किंवा कुटुंबीयांनी प्रवास करणे आवश्यक आहे.
देशांतर्गत विमान प्रवासावर सवलत मिळते. विदेशी प्रवासासाठी मिळत नाही.
चार वर्षांच्या ब्लॉकमध्ये कर्मचारी २ वेळा एलटीए घेऊ शकतो.
घर व गंतव्य स्थान यातील सर्वाधिक कमी अंतरावरून प्रवास केलेला असावा.
हॉटेलचे भाडे, अन्न व निवासाच्या खर्चासाठी एलटीए दावा करता येत नाही.
आपल्याच शहरातील प्रवासावर एलटीए मिळत नाही.
चार वर्षांत एलटीए घेतलाच नाही तर काय?
- एखाद्या कर्मचाऱ्याने ४ वर्षांच्या ब्लॉकमध्ये एलटीए घेतलाच नसेल
- तर त्यापुढील ब्लॉकच्या पहिल्या वर्षात तोही सवलत घेऊ शकतो, असे ‘मेनस्टे टॅक्स ॲडव्हायजर्स एलएलपी’चे भागीदार कुलदीपकुमार यांनी सांगितले.
एलटीए म्हणजे काय?
एलटीए हा सुट्यात प्रवास करण्यासाठी मिळणारा भत्ता आहे. यात कर्मचाऱ्याचे कुटुंबीयही प्रवास करू शकतात. मात्र, राहण्याचा आणि खाण्या-पिण्याचा खर्च यात दिला जात नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यास रजा घेऊन प्रवास करणे तसेच प्रवासाचे पुरावे कंपनीला सादर करणे आवश्यक आहे.
फॉर्म १२बीबी...
प्रवासाच्या दस्तावेजासोबत फॉर्म १२ बीबी भरून त्यावर स्वाक्षरी करून देणे आवश्यक आहे. आयकरविषयक गुंतागुंत टाळण्यासाठी एलटीएशी संबंधित सर्व दस्तावेज संबंधित वित्त वर्षातच सादर करणे सोयीस्कर असते.
एलटीएचा दावा दाखल करताना पुढील दस्तावेज सादर करणे आवश्यक
अ) मूळ प्रवास बिल. उदा. बस व रेल्वेचे तिकीट.
ब) रेल्वे व विमान सेवा उपलब्ध नसल्यास कार भाड्याची पावती.
क) हवाई प्रवास केल्यास विमानाचे तिकीट व बोर्डिंग पास.
ड) पेमेंट केल्याचा पुरावा म्हणून बँक/क्रेडिट/डेबिट कार्ड/वॉलेट स्टेटमेंट