Zerodha Nithin Kamath News: सर्व प्रयत्न करूनही बँकिंग घोटाळ्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. घोटाळेबाज वेगवेगळ्या प्रकारे लोकांची फसवणूक करत आहेत. मात्र, असे घोटाळे टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेबरोबरच बँकांकडूनही अनेक पावलं उचलण्यात आली आहेत. यासोबतच लोकांना जागरुकही केलं जात आहे. अशातच झिरोदाचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी आता लोकांना घोटाळ्यांपासून वाचवण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये लोकांना बँकिंग फसवणुकीच्या पद्धती आणि टाळण्याचे मार्ग सांगण्यात आलेत.
काय म्हणाले नितीन कामथ?
नितीन कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केलाय. "कल्पना करा, तुमचा फोन वाजलाय. फोनवर बँकेचा प्रतिनिधी असल्याचा दावा केला जातोय. कॉल केल्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड नंबर माहीत पडतो आणि समोरची व्यक्ती तुम्हाला कोणतं अनधिकृत शुल्क असल्याचा दावा करते. त्यानंतर बँकेचं अॅप डाऊनलोड करण्यासाठी एक व्हॉट्सअॅप लिंक दिली जाते. हे तुम्हाला वैध वाटू शकतं, पण हा एक स्कॅम आहे. या बनावट अॅपमध्ये तुम्ही तुमची माहिती भरता आणि तुमचे पैसे गायब होतात. यासोबतच स्कॅमर्स कसं काम करतात हे पाहण्यासाठी व्हिडीओ बघा," असं त्यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलंय.
Imagine this: Your phone rings. It's your "bank." The caller knows your credit card number and claims there's an unauthorized charge they can help reverse. They send you a WhatsApp link to download your bank's app.
— Nithin Kamath (@Nithin0dha) February 13, 2025
Seems legitimate, right? That's exactly what the scammers want… pic.twitter.com/zP5XL6tVYt
आरबीआयनं काय म्हटलंय?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) डिजिटल पेमेंटमधील फसवणुकीच्या वाढत्या घटनांना सामोरं जाण्यासाठी बँका आणि बिगर बँकिंग संस्थांसाठी विशेष इंटरनेट डोमेन - bank.in आणि fin.in सुरू करण्याची घोषणा केली आहे. सायबर सुरक्षेचे धोके आणि 'फिशिंग'सारख्या कारवाया रोखणं तसंच सुरक्षित वित्तीय सेवा सुरळीत करणं जेणेकरून डिजिटल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील विश्वास वाढेल हा या उपक्रमाचा उद्देश आहे.