Join us  

नोकरी गेल्यानंतर आर्थिक गरजा कशा पूर्ण कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 10:50 AM

योग्य नियोजन आणि आर्थिक शिस्त तुम्हाला नवीन नोकरी मिळेपर्यंत तुमचे आर्थिक नियोजन प्रभावीपणे करण्यात मदत करू शकते. नोकरी गेली तर आर्थिक नियोजन कसे करावे ते पाहू... 

- चंद्रकांत दडस (उपसंपादक, मुंबई)

सध्या जगभरात महागाई आणि मंदीच्या भीतीने नोकरी गमावण्याची अनेकांवर वेळ आली आहे. नुकतेच ‘मेटा’ने आणखी १० जणांना कामावरून काढले आहे तर सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याने भारतातही अनेकांची नोकरी जाण्याची भीती आहे. नोकरी जाण्यामुळे खूप कठीण परिस्थिती येऊ शकते. मात्र, योग्य नियोजन आणि आर्थिक शिस्त तुम्हाला नवीन नोकरी मिळेपर्यंत तुमचे आर्थिक नियोजन प्रभावीपणे करण्यात मदत करू शकते. नोकरी गेली तर आर्थिक नियोजन कसे करावे ते पाहू... 

या गोष्टी कायम लक्षात ठेवा...नोकरी गेल्यानंतर अनेक जण नेहमीप्रमाणे खर्च करणे सुरू ठेवतात, त्यामुळे त्यांची बचत लवकरच संपून जाते. ज्यामुळे आर्थिक संकट निर्माण होते. नोकरी गमावणे ही सामान्य परिस्थिती नाही, त्यामुळे तुम्हाला काही कठोर निर्णय घेणे आवश्यक ठरते. तुमचा खर्च कमी करा. तुमच्या सर्व खर्चांची यादी तयार करा आणि गरजेनुसार क्रमवारी लावा. उदाहरणार्थ, अत्यावश्यक खर्च सर्वांत वर ठेवावा. कमी महत्त्वाचे खर्च तळाशी ठेवावेत. भाडे, वीज बिले, जेवण, भाजीपाला आणि शाळेची फी भरणे इत्यादी खर्च तुमच्या खर्चाच्या यादीच्या शीर्षस्थानी ठेवता येतील. तुम्ही ओटीटी सदस्यत्व, क्लब मेंबरशिप, रेस्टॉरंट खर्च, सुट्टीवर जाणे इत्यादी गोष्टींवर होणारा खर्च सहजपणे कमी करू शकता.

तात्पुरती नोकरी शोधालक्षात ठेवा नोकरी गमावणे हा तुमच्या आयुष्यातील एक तात्पुरता टप्पा आहे आणि तो लवकरच निघून जाईल. यावेळी तुम्ही तुमचे मानसिक स्वास्थ्य गमावू नका आणि लवकरात लवकर नवीन नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करीत राहा. तसेच, तुमच्या कौशल्यांवर आधारित अल्पकालीन नोकऱ्या किंवा फ्रीलान्सिंगसारखे तात्पुरते उत्पन्नाचे पर्याय शोधा. जेव्हा तुम्ही बेरोजगार असता तेव्हा थोडेसे उत्पन्नदेखील तुम्हाला खूप मदत करू शकते.

टॅग्स :नोकरी