नवी दिल्ली - तुम्ही जर एटीएम कार्ड घरी विसरला असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना एटीएम/डेबिट कार्डशिवायही पैसे काढण्याची सुविधा देतात. अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने सर्व ATM मधून UPI द्वारे कार्डलेस कॅश विड्रॉल (Cardless Cash Withdrawal) काढण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सर्व बँका आणि एटीएममधून प्रस्तावित आहे. UPI च्या माध्यमातून ग्राहक पैसे काढू शकतील."
स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँकेत काही ठिकाणी कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधेत, एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकाला त्याचे डेबिट कार्ड वापरण्याची गरज नाही. देशातील सर्व बँकांच्या एटीएममध्ये लवकरच UPI चा पर्याय दिसणार आहे. UPI द्वारे कार्डलेस कॅश विड्रॉल काढण्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही. याबाबत तज्ञांनी काही परिस्थितींबद्दल सांगितले आहे की कार्डलेस, UPI एनेबल्ड एटीएममधून पैसे कसे काढता येतील.
पर्याय 1 (टच स्क्रीन एटीएम)
- ग्राहकांना रिक्वेस्ट डिटेल्स एटीएममध्ये भरावे लागतील.
- एटीएममध्ये क्यूआर कोड तयार होईल.
- ग्राहक UPI एप्लिकेशनद्वारे QR कोड स्कॅन करतील आणि रिक्वेस्ट अप्रूव्ह करतील.
- आता तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येतील.
पर्याय 2 (टच स्क्रीन एटीएम)
- ग्राहकाला एटीएममध्ये UPI आयडी आणि रक्कम टाकावी लागेल.
- त्याच्या UPI अर्जावर एक रिक्वेस्ट येईल. ती पिनद्वारे अप्रूव्ह करावी लागेल.
- आता तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येतील.
UPI म्हणजे काय?
डिजिटल पेमेंटसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारखी सुविधा तुम्हाला घरबसल्या सहजपणे पैसे ट्रान्सफर करू देते. यासाठी, तुम्हाला Paytm, PhonePe, BHIM, Google Pay इत्यादी UPI ला सपोर्ट करणारे App हवे आहे. विशेष म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी यापैकी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.