नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नवनवीन कंपन्यांचे IPO सादर केले जात आहेत. डिसेंबर महिन्यात १० कंपन्यांचे आयपीओ सादर होणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच अॅडव्हेसिव्ह आणि सीलंट्सचे उत्पादक असलेल्या कंपनीने आयपीओची घोषणा केली आहे.
अॅडव्हेसिव्ह आणि सीलंट्सचे उत्पादक असलेल्या एचपी अॅडव्हेसिव्ह लिमिटेड या कंपनीने IPO ची घोषणा केली आहे. १५ डिसेंबर २०२१ रोजी या कंपनीचा आयपीओ शेअर मार्केटमध्ये खुला होणार असून, १७ डिसेंबर २०२१ पर्यंत या शेअरचे सबस्क्रिप्शन घेता येईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. एचपी अॅडव्हेसिव्ह कंपनीने IPO साठी प्रति शेअर २६२ ते २७४ रुपये किंमत निश्चित केली आहे.
एचपी अॅडव्हेसिव्ह IPO मधून किती निधी उभारणार?
IPO मध्ये कंपनीच्या ऑफर पश्चात पेड अप इक्विटी शेअर कॅपिटला २५.०२ टक्के हिस्सा समाविष्ट आहे. यात ४१४०००० इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू असेल आणि ४५७२०० पर्यंत इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफ समाविष्ट असून, इश्यूचा एकूण आकार १२५.९६ कोटी इतका आहे. या इश्यूमधून जमा होणाऱ्या निधीपैकी २५.५१ कोटी भांडवली खर्चासाठी वापरण्यात येतील आणि ५४ कोटी खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
किमान ५० शेअर्ससाठी बोली लावता येणार
गुंतवणूकदारांना किमान ५० शेअर्ससाठी बोली लावता येईल, ज्याची अप्पर प्राइस बँडची रक्कम १३७०० इतकी आहे आणि त्यानंतर ५० शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल. रिटेल गुंतवणूकदारांना कमाल १४ लॉटपर्यंत किंवा ७०० शेअर्सपर्यंत बोली लावता येईल, ज्याची एकूण रक्कम १९१८०० इतकी होते. युनिस्टोन कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
दरम्यान, एचपी अॅडव्हेसिव्ह लिमिटेड या कंपनीचे देशभर वितरण नेटवर्क आहे. इतकेच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला या कंपनीतर्फे पुरवठा केला जातो. या कंपनीचे देशात ७५० हून अधिक वितरक आहेत जे ५० हजारहून अधिक डीलर्सना सेवा प्रदान करतात. गेल्या वर्षी २१ हून अधिक देशांमध्ये या कंपनीतर्फे उत्पादन निर्यात करण्यात आले. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये एचपी अॅडहेसिव्ह्जचे एकूण उत्पन्न १२३.८८ कोटी होते आणि त्यांची ईबीआयडीटीए १७.६९ कोटी होता आणि करोत्तर नफा १०.०६ कोटी होता.