Join us

एचएसबीसी तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 5:45 AM

एचएसबीसी बँकेला आपल्या व्यवस्थापन खर्चामध्ये मोठी कपात करायची आहे.

नवी दिल्ली : उच्च वेतनश्रेणीच्या १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार एचएसबीसी बँकेने चालविला आहे. काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून जगभरातील मोठमोठ्या आस्थापनांमध्ये असा विचार सुरु आहे. अशी नोकरकपात करण्याबाबत एचएसबीसीचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्वीन विलक्षण आग्रही आहेत.एचएसबीसी बँक तिस-या तिमाहीचा अहवाल या महिनाखेर सादर करणार असून त्यावेळी नोकरकपातीचा निर्णयही जाहीर केला जाईल, अशी शक्यता आहे. एचएसबीसी बँकेला आपल्या व्यवस्थापन खर्चामध्ये मोठी कपात करायची आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षात घेतला नव्हता, तो नोकरकपातीचा निर्णय बँक घेणार आहे. गलेलठ्ठ पगार घेणा-यांच्या नोकरीवर त्यामुळे गदा येईल.व्यवस्थापन खर्चात कपात करण्याबाबत एचएसबीसीचे बँकेचे अध्यक्ष मार्क टकर यांच्याशी मतभेद झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन फ्लिंट यांना आपले पद सोडावे लागले. त्यानंतर आॅगस्टमध्ये नोएल क्वीन हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. सूत्रे हाती घेताच नोएल क्वीन यांची पावले नोकरकपातीच्या दिशेने पडण्यास सुरुवात झाली. एचएसबीसी यंदाच्या वर्षी ४ हजार कर्मचा-यांना नोकरीतून काढणार आहे.बाजारपेठीय उलाढालींवरही परिणामचीन व अमेरिकेमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे, हाँगकाँगमध्ये अस्थिर वातावरण असून त्याचा परिणाम बाजारपेठीय उलाढालींवर होत आहे. त्यात ब्रेक्झिटचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा वातावरणात एचएसबीसी बँकेला काटकसरीचे उपाय अवलंबिण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळेच नोकरकपातीचा कठोर निर्णय या बँकेने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :व्यवसाय