चिन्मय काळे
मुंबई : तयार कपड्यांच्या जगात मागे पडत चाललेल्या असंघटित टेलरिंग क्षेत्रात कौशल्याचे बीज रोवले जात आहे. देशात १० लाखांवर असलेल्या टेलर्सना त्यामुळे आधुनिक ‘स्टाइल’ शिकून जागतिक मंचावर कसब दाखविता येईल. मंगळवार, २८ फेब्रुवारी या जागतिक टेलरिंग दिनाच्या निमित्ताने हा विषय महत्त्वाचा ठरतो.
शिंपी किंवा दर्जी किंवा टेलर, हा महत्त्वाचा व्यवसाय रेडिमेडच्या काळात अडचणींचा सामना करीत आहे. लोक हल्ली कापड विकत घेऊन शिंप्याकडून ते शिवून घेण्याऐवजी तयार कपडे विकत घेताना दिसतात. त्यामुळे शिंप्यांचे काम रफ्फू करणे, बटणे लावणे, उसवलेले शिवून देणे, चेन बसविणे एवढेच राहिले आहे. अत्याधुनिक यंत्रांची कमतरता, नवनव्या स्टाइल व ट्रेंड्स जाणून घेण्यासंबंधी जागरूकतेचा अभाव व संसाधनांचा तुटवडा यामुळेच टेलर्स अडचणीत आले आहेत. हे क्षेत्र संघटितही नाही. त्यामुळे या व्यवसायाला कौशल्य मिळवून देण्यासाठी रेमण्ड समूहाने पुढाकार घेतला आहे.
जागतिक स्तरावर दर दोन वर्षांनी स्टाइल मास्टर टेलर्सची स्पर्धा होते. गेल्या वर्षी ती तायपेईला झाली. तेथे टेलर्सनी सादर केलेले डिझाइन्स भारतातही तयार होऊ शकतात, असे वाटल्याने आम्ही भारतीय टेलर्सना या स्पर्धेसाठी तयार करण्याचा निर्णय घेतला, असे रेमण्डचे संचालक मोहित धंजाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या स्पर्धेत देशातील चार विभागांत १ हजारहून अधिक टेलर्स सहभागी झाले. अनेक टेलर्स ग्रामीण भागातील होते. त्यातून ४0 जणांची निवड करण्यात आली. त्यांनी इंडो-वेस्टर्न व वेस्टर्न पद्धतीचे उत्तम डिझाइन्स सादर केली. या ४० पैकी तीन सर्वोत्तम टेलर हे यंदाच्या आशिया मास्टर स्टाइल व पुढील वर्षी होणाºया वर्ल्ड मास्टर स्टाइल स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
हब जोडणार १ लाख टेलर्स-
ग्रामीण भागात शिंपी अधिक आहेत. त्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपनी देशात ५० हब ‘स्किल इंडिया’ अंतर्गत उभारणार आहे. सुमारे २५ ते १५० टेलर्स प्रत्येक हबला जोडले जातील.
हबमध्ये अत्याधुनिक शिवण यंत्रांपासून ते जागतिक स्तरावरील अत्याधुनिक स्टाइल्सबाबतचे मार्गदर्शन टेलर्सना दिले जाईल. सध्या असे २५ हब तयार असून २०१८ पर्यंत २० हजार शिंपी त्यात प्रशिक्षित होणार आहेत. हा आकडा १ लाखापर्यंत नेला जाणार आहे.
काय आहे ‘टेलरिंग डे’?
जागतिक टेलरिंग दिवस हा शिवणयंत्राचे संशोधक सर विल्यम इलिआस होव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा केला जातो. होव यांनी १७९० मध्ये या यंत्राचा अमेरिकेत शोध लावला, तर १९२७ मध्ये ‘टेलर’ हा शब्द हॉवर्ड विद्यापीठाने डिक्शनरीत आणला.
50 ठिकाणी हब : पारंपरिक शिंपी होताहेत ‘स्टायलो’, कौशल्य शिकून जागतिक मंचावर
तयार कपड्यांच्या जगात मागे पडत चाललेल्या असंघटित टेलरिंग क्षेत्रात कौशल्याचे बीज रोवले जात आहे. देशात १० लाखांवर असलेल्या टेलर्सना त्यामुळे आधुनिक ‘स्टाइल’ शिकून जागतिक मंचावर कसब दाखविता येईल. मंगळवार, २८ फेब्रुवारी या जागतिक टेलरिंग दिनाच्या निमित्ताने हा विषय महत्त्वाचा ठरतो.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:32 AM2018-02-28T00:32:12+5:302018-02-28T00:32:12+5:30