Join us  

श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 7:17 AM

दरवर्षी १० कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींची संख्या मागील पाच वर्षांत तब्बल ६३ टक्के वाढून तब्बल ३१,८०० वर पोहोचली आहे.

नवी दिल्ली : भारतात श्रीमंतांची संख्याच नव्हे, तर त्यांची कमाई सुद्धा वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने जारी केलेल्या ताज्या अहवालातून हे समोर आले आहे.

दरवर्षी १० कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींची संख्या मागील पाच वर्षांत तब्बल ६३ टक्के वाढून तब्बल ३१,८०० वर पोहोचली आहे. तर दर वर्षाला ५ कोटींपेक्षा अधिक मिळकत असलेल्यांची संख्या ४५ टक्के वाढून ५८,२०० वर पोहोचली आहे. देशात १० लाख लोक असे आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाखांपेक्षा अधिक आहे. पाच वर्षांत यांची संख्या २५ टक्के वाढली आहे.

दरवर्षाला १० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या ३१,८०० जणांची २०१८-१८ ते २०२३-२४ या काळातील एकूण कमाई वार्षिक १२१ टक्के वाढून ३८ लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती या अहवालात दिली आहे. ही संपत्ती भविष्यात किती वाढू शकेल, याचाही अंदाज अहवालात मांडला आहे.

अहवालानुसार २०१८-१८ ते २०२३-२४ या काळात देशातील श्रीमंतांची कमाई वेगाने वाढली आहे. याच काळात कोरोना साथीच्या संकटामुळे अनेक मोठ्या देशांना मोठा आर्थिक फटका बसला होता.

अशी वाढली कोट्यधीशांची संपत्ती

कमाई   कोट्यधीश      वाढीचे प्रमाण    एकूण संपत्ती     वाढीचे प्रमाण

१० कोटी ३१,८००  ६३%   ३८ लाख कोटी   १२१%

५ कोटी  ५८,२००  ४५%  ४० लाख कोटी   १०६%

५० लाख १०,००,०००      २५%  ४९ लाख कोटी   ६४%

व्यवस्थापनात मात्र मागे?

७५% प्रगत अर्थव्यवस्थेमधील संपत्तीचे नीटपणे व्यवस्थापन केले जाते

१५% भारतात केवळ संपत्तीचे व्यवस्थापन केले जात आहे.

२०२८ पर्यंत २.२ लाख कोटी डॉलर्सच्या घरात

या अहवालानुसार, २०२८ पर्यंत देशातील हाय नेटवर्थ असेलेले आणि अल्ट्राय हाय नेटवर्थ असलेल्या अति श्रीमंत व्यक्तींची संख्या  वाढणार आहे. अति श्रीमंतांकडील १.२ लाख कोटी डॉलर्सची संपत्ती या काळात २.२ लाख कोटी डॉलर्सच्या घरात पोहोचणार आहे. या कालखंडात अति श्रीमंतांची संख्या दरवर्षी १३ ते १४ टक्के वाढू शकते.