झुरिक - विदेशी बँकात असलेला भारतीयांचा काळा पैसा परत आणण्याचे देशवासीयांना आश्वासन देण्याऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदींकडून सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून, स्विस नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतीयांच्या स्विस बँकांमधील खात्यांतील रकमेत सुमारे 50 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे स्वीस बँकेतील भारतीयांच्या ठेवींचा आकडा सात हजार कोटी रुपयांवर पोहोलचा आहे. स्विस नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीयांनी स्वीस बँकेत थेटपणे जमा केलेल्या रकमेचा आकडा 99.9 कोटी स्विस फ्रँक (सुमारे 6 हजार 900 रुपये) आहे. तर इतर माध्यमातून जमा केलेली संपत्तीही (1.6 कोटी स्विस फ्रँकवर (सुमारे 110 कोटी रुपये) पोहोचली आहे. या आकडेवारीनुसार स्विस बँकांमधील परदेशी नागरिकांच्या ठेवींचा आकडा 1460 स्विस फ्रँक (सुमारे 100 लाख कोटी रुपये) एवढा झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून काळ्यापैशाविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्यामुळे स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये झालेली वाढ ही धक्कादायक मानली जात आहे. स्विस बँका ह्या आपल्या ग्राहकांच्या ठेवींबाबतची माहिती अत्यंत गोपनीय ठेवतात. त्यामुळे स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या जातात. |2016 साली स्विस बँकांमधील भारतीयांच्या ठेवींमध्ये 45 टक्क्यांनी घट झाली होती. त्यानंतर स्विस बँकेतील भारतीयांच्या एकूण ठेवी ह्या 676 दशलक्ष स्विस फ्रँक (सुमारे 4500) कोटी रुपये एवढ्याच उरल्या होत्या. मात्र 2017 साली या रकमेत मोठी वाढ झाली आहे.
मोदींचे प्रयत्न निष्फळ, स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 8:42 PM