Join us

दुबईत बनावट भारतीय नोटांचा प्रचंड वापर

By admin | Published: October 27, 2015 11:09 PM

येथील बाजारात बनावट भारतीय नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला असून, सरकारने चलन विनिमय कंपन्या, त्यांचे ग्राहक आणि लोकांना याबाबत सावध केले आहे

दुबई : येथील बाजारात बनावट भारतीय नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला असून, सरकारने चलन विनिमय कंपन्या, त्यांचे ग्राहक आणि लोकांना याबाबत सावध केले आहे. विशेष म्हणजे या बनावट नोटा भारतीय नोटांशी मिळत्याजुळत्या आहेत.याबाबत स्थानिक वृत्तपत्रांतून वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या बनावट नोटांची छपाई इतक्या बेमालूमपणे केली जात आहे की, सामान्य लोकच नव्हे, तर विनिमय केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही त्या ओळखणे कठीण जात आहे. इतक्या चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या छापल्या जात आहेत.शारजाहमधील एका विदेशी चलन विनिमय केंद्राला बनावट नोटांच्या प्रकरणातून संयुक्त अरब अमिरातीच्या न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. याच कंपनीच्या वकिलाने बनावट नोटांची माहिती दिली होती. केवळ एम.एस. असे नाव सांगणाऱ्या एका भारतीय नागरिकाला जूनमध्ये गुप्तचर विभागाने पकडले होते. ‘दिरहम’ या दुबईतील चलनाच्या मोबदल्यात एकाने दिलेल्या भारतीय चलनाच्या नोटा बनावट असल्याचे त्यावेळी उघडकीस आले होते.या प्रकरणी केरळच्या एका महिलेला अटक झाल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती झाली होती. या महिलेनेही एका बँकेला बनावट भारतीय नोटा दिल्या होत्या. याबाबतचा सारा तपशील ‘खलिज टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. सरकारी वकील मोहंमद अलकी म्हणाले की, त्या महिलेच्या पतीने काही भारतीय रुपयांच्या बदल्यात ‘दिरहम’ घेतले होते. या महिलेने केरळमधील मुलांच्या शिक्षणासाठी बँकेत ६ हजार रुपये भरले होते. त्यात एक हजार रुपयांच्या पाच नोटा बनावट निघाल्या होत्या. बनावट नोटा शोधून काढण्यासाठी विशेष प्रकारच्या मशीनची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.