कधी ना कधी तुम्ही 'कॅफे कॉफी डे'ची पायरी नक्कीच चढला असाल. अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी (A lot Can Happen over Coffee) ही त्यांची प्रसिद्ध टॅगलाईन. कॉफी जितकी चांगली तितकाच कॅफे कॉफी डे चा आताचा प्रवास हा खडतर होता. सुरुवातीला यश आणि आता कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली ही कंपनी आता पुन्हा आपली मूळं मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. कर्जात असलेल्या कंपनीचा भार आणि आपल्या पतीच्या आत्महत्येच्या दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरही मालविका हेगडे यांनी धीर सोडलेला नाही. आपल्या पतीनं ज्या कंपनीला मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ती कंपनी आता कर्जातून मुक्त करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. पाहूया आजपर्यंतचा कॅफे कॉफी डे चा प्रवास कसा होता.
कसा सुरू झाला प्रवास?
सीसीडीचा पाया 1996 मध्ये व्हिजी सिद्धार्थ यांनी रचला. 1992 पर्यंत, सिद्धार्थ यांनी सुमारे 6-7 हजार एकरांवर पसरलेल्या कॉफीचे मळे विकत घेतले होते. शेअर मार्केटमधून काही पैसे कमावले आणि काही पैसे वडिलांनी दिले. त्यांच्या मदतीनं त्यांनी कॉफी डे ग्लोबल लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. 11 जुलै 1996 रोजी त्यांनी बंगळुरूमध्ये पहिले कॅफे कॉफी डे आउटलेट उघडले. भारतीय तरुणांमध्ये कॉफीची क्रेझ वाढत होती, ज्याला सीसीडीने नवी ओळख दिली. कॅफे लोकांच्या भेटीचं आणि चर्चा करत बसण्याचं ठिकाण बनलं. CCD ला खूप प्रसिद्धी मिळत होती.
कर्जाचं ओझं आणि आत्महत्या
2000 सालापर्यंत कंपनी नफ्यात होती. परंतु 2015 पासून कंपनीला उतरती कळा लागू लागली. विजी सिद्धार्थ यांनी इतर व्यवसायात हात आजमावू आजमावला. मुख्य व्यवसायापासून दूर जात त्यांनी रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिकसारख्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. कर्जाचा बोजा वाढत गेला. आयकर विभागानं कंपनीवर 700 कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीचा आरोप लावल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या. एकीकडे वाढतं कर्ज आणि दुसरीकडे करचुकवेगिरीचा आरोप होता. 2019 पर्यंत कंपनी 6547 कोटी रुपयांच्या कर्जात बुडाली होती. कर्ज आणि आयकर विभाग यांच्यात सापडलेल्या व्हिजी सिद्धार्थ यांनी 2019 मध्ये नदीत उडी मारून आत्महत्या केली.
मालविका हेगडेंनी सांभाळली धुरा
कर्जाच्या दबावाखाली पतीने आत्महत्या केली. कंपनीवर हजारो कोटींचे कर्ज होतं. आता सर्व जबाबदारी मालविका हेगडे यांच्या खांद्यावर आली आहे. कंपनी 7 हजार कोटींच्या कर्जात बुडाली आणि 25 हजार कर्मचाऱ्यांची जबाबदारीदेखील त्यांच्यावर होती. पण मालविका यांनी हिंमत सोडली नाही. आता ही कंपनी बंद होईल असं लोक गृहीत धरत होते, पण त्यांनी परिस्थितीचा सामना करण्याचा निर्णय घेतला.
पतीच्या निधनानंतर मालविका यांनी हिंमत दाखवली आणि सीसीडी वाचवण्याची मोहीम एक सुरू केली. 31 जुलै 2019 पर्यंत कंपनीवर 7 हजार कर्ज होते. मालविका डिसेंबर 2020 मध्ये सीसीडी एन्टरप्राईजेस लिमिटेडच्या (CCD Enterprises Limited) सीईओ बनल्या. कर्ज कमी करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यांनी प्रथम कर्मचार्यांना पत्र लिहून कंपनीची स्थिती आणि त्यांच्या कर्मचार्यांचे भविष्य सुधारण्यासाठी वचनबद्ध असल्याचं आश्वासन दिलं. २०२१ मध्ये त्यांनी १,६४४ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली.
दोन वर्षात चित्र बदललं
मालविका हेगडे या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएस कृष्णा यांच्या कन्या आहेत. कर्ज कमी करण्यासोबतच महसूल वाढवण्यावरही त्यांचा भर आहे. मालविका हेगडे यांनी अमेरिकन कंपनी ब्लॅकस्टोन आणि श्रीराम क्रेडिट कंपनीसोबत व्यावसायिक करार केला. खर्च कमी करण्याचे मार्ग शोधले. त्यांनी कंपनीचे कर्ज 1731 कोटींवर आणलं. आज देशातील 165 शहरांमध्ये जवळपास 572 सीसीडी आउटलेट आहेत. दोन वर्षात त्यांनी कंपनीचा महसूल वाढवला आणि कर्ज आणखी 465 कोटींवर आणले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पतीच्या निधनानंतर तिने दोन्ही मुलांचा सांभाळ केला आणि कंपनी वाचवण्याची जबाबदारी घेतली. मालविका यांनी कंपनी ताब्यात घेतल्यापासून त्यांनी कंपनीवरील कर्ज जवळपास ९५ टक्क्यांनी कमी केलंय.