नवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. घाऊक आणि किरकाेळ महागाईच्या दरात माेठी घट झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, १८ महिन्यांनी घाऊक महागाईचा दर एकअंकी आकड्यात आला आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये घाऊक किमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर घसरून ८.३९ टक्क्यांवर आला तर किरकाेळ महागाईचा दर घसरून ६.७७ टक्क्यांवर आला.सोमवारी केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाईचा दर सलग १८ महिने १० टक्क्यांच्या वर हाेता. युक्रेन युद्ध, इंधन दरवाढ आदी कारणांमुळे त्यात घट होत नव्हती. मात्र, जुलैनंतर त्यात हळूहळू घट होण्यास सुरूवात झाली.
सामान्य नागरिकांवर काय परिणाम होणार? n घाऊक क्षेत्रातील महागाईमुळे उत्पादन क्षेत्रावर थेट परिणाम होतो. या किमती दीर्घकाळ वाढत राहिल्या तर उत्पादक वस्तूंच्या किमती वाढवून हा भार ग्राहकांवर हस्तांतरित करतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना फटका बसताे. n कर कमी करूनच यावर नियंत्रण मिळविणे सरकारला शक्य होते. उदा. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास सरकार उत्पादन शुल्क कमी करून इंधन दर नियंत्रणात ठेवू शकते.
१८ महिन्यांनी घाऊक महागाई एक अंकी, किरकोळ महागाईतही घटमार्चनंतर माेठी घट- महागाई दर आता मार्च २०२१ नंतरच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. मार्च २०२१ मध्ये तो ७.८९ टक्के होता. वस्तूंच्या किमतीत घट झालेल्या डब्ल्यूपीआय खाली आला आहे. - महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने चालू आर्थिक वर्षात चारवेळा व्याजदरात वाढ केली आहे. महागाईचा दर सहा टक्क्यांच्या आत आणण्याचे आरबीआयसमोर लक्ष्य आहे. गहू आणि डाळ महाग- खनिज तेल, धातू, धातूंची उत्पादने, कपडे, अन्नधान्य, भाजीपाला, आदी वस्तूंच्या किमतीमध्ये घट झाल्यामुळे महागाईचा दरही घटला आहे. - भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती घटल्यामुळे सर्वसामान्यांना माेठा दिलासा मिळाला आहे. मात्र, गहू आणि डाळींच्या किमती अजूनही वाढलेल्याच असल्यामुळे चिंता कायम आहे.