Stock Market Scam : देशात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. क्रिमिनल रोज नवनवीन क्लुप्त्या शोधून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. तुम्हीही सावध राहिला नाही तर एक दिवस तुमचाही बळी गेल्याशिवाय राहणार नाही. शेअर बाजाराकडे भारतीयांचा ओढा पाहून याचा फायदा आता फसवणूक करणारे घेत आहेत. अशीच एक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. शेअर बाजारातून मोठी कमाई करण्याच्या युक्त्या शिकवण्याच्या बहाण्याने एका ६३ वर्षीय व्यक्तीला ५० लाख रुपयांना गंडा घातला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी या व्यक्तीला 'स्कायरिम कॅपिटल' नावाच्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करायला लावली होती. वृद्धाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
पीडित व्यक्तीच्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गुन्हेगाराशी ओळख झाली होती. ‘स्टॉक डिस्कशन ग्रुप’मध्ये सामील होण्यासाठी त्यांना लिंक पाठवण्यात आली होती. ग्रुप अॅडमिनिस्ट्रेटर कुणाल सिंग यांनी एक प्रतिष्ठित आर्थिक सल्लागार असल्याची ओळख करुन दिली होती. तो लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या टीप्स देत होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी भरघोस नफा कमावला असल्याचे सांगण्यात आले. अनेकांना त्यांनी सुचविलेल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून ५०० टक्क्यांपर्यंत परतावा मिळाल्याचा दावा केला. कुणालने ज्येष्ठ व्यक्तीला ऑनलाइन क्लासमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले.
कसा होता ट्रॅप?
कुणाल सिंग त्याच्या ऑनलाइन क्लासमध्ये शेअर बाजारातील ट्रेंड आणि गुंतवणुकीबद्दल माहिती देत होता. वास्तविक, त्याचा उद्देश वर्गात उपस्थित असलेल्या लोकांना फसवून त्याच्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याचा होता. हैदराबादचा एक व्यक्ती त्याच्या जाळ्यात अडकला. 'स्कायरिम कॅपिटल' नावाच्या प्लॅटफॉर्मद्वारे त्यांनी अनेक शेअर्समध्ये पैसे गुंतवले. सुरुवातीला थोड्या गुंतवणुकीवर चांगला नफा दाखवला जात होता. त्यामुळे पीडितेचा आत्मविश्वास वाढला. नंतर तो घोटाळेबाजांना बळी पडला आणि त्याने मोठी रक्कम गुंतवली. त्यांनी एकूण ५० लाख रुपये गुंतवले.
नफा दिसला पण काढता आला नाही
प्लॅटफॉर्मवर ५० लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर नफा दाखवला जात होता. परंतु, पीडितेने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, ते शक्य झाले नाही. पैसे काढता न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कुणालशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन बंद येत होता. अखेर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.