Hyundai Motor India IPO: देशातील सर्वात मोठा आयपीओ पुढील आठवड्यापासून गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. आम्ही बोलत आहोत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड आयपीओबद्दल. ह्युंदाई मोटर इंडियाचा २५,००० कोटी रुपयांच्या आयपीओ १५ ऑक्टोबररोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना १७ ऑक्टोबरपर्यंत या इश्यूमध्ये गुंतवणूक करता येईल. तर १४ ऑक्टोबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ खुला होणार आहे.
ह्युंदाई मोटर्स इंडियाच्या या इश्यूसाठी प्राइस बँड निश्चित करण्यात आलाय. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या आयपीओची किंमत १,८६५ ते १,९६० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ असेल. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) २१,००० कोटी रुपयांचा आयपीओ आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ मानला जात आहे.
काय आहेत डिटेल्स?
ह्युंदाई मोटर इंडियाच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये ७ शेअर्स आहेत आणि त्यानंतर त्या पटीत आहेत. ह्युंदाई मोटर इंडियाच्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (क्यूआयबी) ५० टक्क्यांहून अधिक, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी (एनआयआय) १५ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी ७७८,४०० इक्विटी शेअर्स आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअरमागे १८६ रुपयांची सवलत दिली जात आहे. दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी शेअर वाटपाची अंतिम स्थिती निश्चित केली जाईल आणि कंपनी सोमवार २१ ऑक्टोबरपासून परतावा सुरू करेल. तर परताव्यानंतर त्याच दिवशी शेअर्स अलॉटीजच्या डिमॅट खात्यात जमा होतील. ह्युंदाई मोटर इंडियाचे शेअर्स मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.
जीएमपीमध्ये घसरण
Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ आज १४७ रुपयांच्या प्रीमियमवर आहे. आयपीओचा अपर प्राइस बँड आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता ह्युंदाई मोटर इंडियाच्या शेअरची अंदाजित लिस्टिंग किंमत २,१०७ रुपये प्रति शेअर असू शकते. या आयपीओची किंमत १४७ रुपयांपेक्षा ७.५% जास्त आहे. ग्रे मार्केट कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण होत आहे. आज ग्रे मार्केटमध्ये हा शेअर १४७ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे, तर ७ ऑक्टोबरला हा शेअर २७० रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध होता. ३ ऑक्टोबरला त्याचा जीएमपी ३६० रुपये आणि २८ सप्टेंबरला जीएमपी ५०० रुपये होता.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)