नवी दिल्ली : भारताने जोखीम घेण्याचे न टाळता ही एक संधी आहे, असे समजून ‘बिल्ड इन इंडिया आणि मेक इन इंडिया’ धोरण राबवले पाहिजे, असे मत कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्त केले.
इंडिया टुडे टीव्ही न्यूजचे संचालक राहुल कंवल यांच्याशी चर्चा करताना ते बोलत होते. चर्चेत कायदा, माहिती, तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसादही सहभागी होते. ‘मेड इन चायना’ची जागा ‘मेड इन इंडिया’ घेऊ शकेल का, असे विचारले असता कोटक म्हणाले, ‘भारत सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’चा जो पुढाकार घेतला आहे, त्यात मला पूर्ण आत्मविश्वास आहे.’ उदय कोटक यांची नुकतीच २०२०-२०२१ वर्षासाठी कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
भारताने जोखीम घेण्याचे न टाळता ही एक संधी आहे, असे समजून ‘बिल्ड इन इंडिया, मेक इन इंडिया धोरण राबवले पाहिजे, असे ते म्हणाले. आज जगात चीन आणि इतर देश, असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि चीन हा जगाचा कारखाना असल्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त लक्ष केंद्रित झाले असून, तेवढेच अवलंबित्वही वाढले आहे. आज जगातील महत्त्वाचे देश चीनच्या पलीकडे बघू इच्छितात, असे कोटक म्हणाले.
कोटक म्हणाले, ‘भारतीय कंपन्या गेल्या काही वर्षांत संक्रमण अवस्थेत होत्या व त्याचे कारण म्हणजे देश एका वेगळ्या प्रकारच्या व्यवस्थेकडे (गव्हर्नन्स) मार्गक्रमण करीत होता आणि भारतात व्यवसायाला ज्या प्रकारचा दर्जा अपेक्षित होता, त्यापेक्षा तो वेगळा होता. भारताने चीनची जागा घेण्यास जे लक्ष्य ठेवले आहे, त्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या जमीन आणि मजूर सुधारणा या फक्त समोर दिसणाऱ्या नाहीत, तर जगासाठी पडद्यामागेही महत्त्वाच्या आहेत.’ उत्पादनाबद्दल सांगताना कोटक म्हणाले, ‘भारतीय उत्पादनांची निर्मिती करणारे कारखाने निम-नागरी भारतात हलवले जावेत म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निम-नागरी धोरणाची गरज आहे. यातून आणखी जास्त संधी उपलब्ध होतील.’
मजूर सुधारणांबाबत बोलताना कोटक म्हणाले, ‘लवचिक कामगार धोरण हे फेअर सेफ्टी नेट असले पाहिजे हे धोरणकर्त्यांनी लक्षात असू द्यावे.’ मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘कोरोनानंतरचे जग हे कोरोना आधीच्या जगासारखे असणार नाही. जगाचा व्यापार, उत्पादन पद्धती बदलतील, जगाचे राजकारण बदलेल. डिजिटल ही आता एक पद्धत बनून जाईल.’
चीन हा जगाचा कारखाना असल्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त लक्ष केंद्रित झाले असून, अवलंबित्वही वाढले आहे. जगातील देश चीनच्या पलीकडे बघू इच्छितात.
-उदय कोटक, कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कोटक महिंद्रा बँक
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या कठीण परिस्थितीत देशाचे नेतृत्व ज्या पद्धतीने केले आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना भारत हा फारच सुरक्षित, प्रोत्साहन देणारा देश असल्याचा विचार करायला प्रवृत्त केले आहे. - रविशंकर प्रसाद,
कायदा व न्यायमंत्री