लंडन : मी पूर्णपणे कफल्लक झालो आहे व धंद्यासाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करायला माझ्याकडे आता कवडीही शिल्लक नाही, असा दावा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक कुटुंबाचे सदस्य असलेले रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी लंडनमधील हायकोर्टात केला आहे.
आता पार डबघाईला आलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीस दिलेले ५५० दशलक्ष पौंडाच्या कर्जाच्या वसुलीसाठी चीनमधील तीन सरकारी बँकांनी दाखल केलल्या दाव्यात अनिल अंबानी यांनी हा दावा केला आहे. अंबानी यांनी परतफेडीची व्यक्तिश: हमी दिली असल्याने खासगी मालमत्ता विकून आम्हा पैसे चुकते करावे, असे बँकांचे म्हणणे आहे. या दाव्यात अनिल अंबानी यांनी असे उत्तर सादर केले की, माझ्या गुंतवणुकीचे मूल्य पार कोलमडले आहे. माझ्याकडे असलेल्या भांडवलाचे सध्याचे मूल्य कमालीने घसरून ६३.७ दशलक्ष पौंंड एवढे झाले आहे. परंतु माझ्या डोक्यावर अससलेली देणी विचारात घेता माझे नक्त मूल्य शून्य आहे. मागणी केलेली रक्कम चुकती करण्यासाठी विकता येतील, अशा आता माझ्या काही मालमत्ताच शिल्लक नाहीत.‘कुटुंबाचाही आधार नाही’मध्यंतरी एरिक्सन या स्वीडिश टेलिकॉम कंपनीचे ६० दशलक्ष पौंडाचे देणे दिले नाही तर तुरुंगात टाकण्याची तंबी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनिलअंबानी यांना दिली तेव्हा मोठे बंधू मुकेश यांनीते पैसे देऊन कुटुंबाची लाज राखली होती. पण आता कुटुंबात कोणी मदत करायला तयार नाही.