मुंबई : फर्निचर क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी कंपनी आयकियाने भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत नवी मुंबईत आगामी १८ महिन्यांत १,५00 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनी करणार आहे. एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार, आयकिया २0२५ पर्यंत भारतात २५ स्टोअर्स उघडणार आहे. त्यातील पहिले स्टोअर नवी मुंबईत उघडण्यात येणार आहे. याशिवाय अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ओवेन्स कॉर्निंग आणि एमर्सन यांसारख्या कंपन्याही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की, आयकिया आता आपली गुंतवणूक सुरू केली आहे. कंपनीने नवी मुंबईत ४00 कोटी रुपयांत एक भूखंड खरेदी केला आहे. या भूखंडावर ४ लाख वर्गफूटाचे मोठे स्टोअर कंपनी उघडणार आहे. कंपनी सुमारे १,५00 कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे.
आयकियाचे हे भारतातील पहिली किरकोळ विक्रीचे दुकान असेल. ही कंपनी स्वीडनची आहे. २0१७ च्या दुसऱ्या सहामाहीत कंपनी हैदराबादेत दुकान उघडणार आहे. चंद्रा यांनी सांगितले की, आता कंपनीने नवी मुंबईत जमीन घेतली आहे. आणि आगामी वर्ष-दीड वर्षात तेथे आपले दुकान कंपनी उघडणार आहे. खाजगी मालकीच्या या कंपनीला मुंबईतील आपल्या दुकानात वर्षाला ५0 लाख ग्राहक येण्याची अपेक्षा आहे.
आयकिया बंगळूर, दिल्ली
आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रांतही आपले स्टोअर्स उभारण्याची शक्यता तपासून पाहत आहे. आयकिया ही कंपनी गेल्या तीन दशकांपासून भारतातून कच्चा माल खरेदी करते. २0२0 पर्यंत आपल्या पुरवठादारांची संख्या वाढविण्याची कंपनीची योजना आहे. (प्रतिनिधी)
चंद्रा यांनी सांगितले की, अमेझॉनही महाराष्ट्रात गुंतवणूक करीत आहे. कंपनी मुंबईत आपली पहिली वेब सेवा सुरू करीत आहे. मुंबईत डाटा केंद्र उभारण्याची कंपनीची योजना आहे.
मायक्रोसॉफ्टही मुंबईत डाटा केंद्र उभारण्याच्या तयारीत आहे. याशिवाय ओवेन्स कॉर्निंग ही कंपनीही अलिकडेच येऊन गेली. या कंपनीने १ हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी मंजुरी घेतली आहे. त्यांनी काम सुरू केले आहे. त्यांना जमीनही मिळाली आहे.
ओवेन्स ही कंपनी इन्शुलेशन, रुफिंग आणि फायबर ग्लासची सामग्री बनविते. चंद्रा यांनी सांगितले की, इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपनी एमर्सन २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे.
आयकिया मुंबईत करणार १,५00 कोटींची गुंतवणूक!
फर्निचर क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी कंपनी आयकियाने भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
By admin | Published: July 14, 2016 03:38 AM2016-07-14T03:38:54+5:302016-07-14T04:05:33+5:30