Nirmala Sitharaman on Indian rupee : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रुपयाची घसरण होत नसून अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याचे म्हटले आहे. “रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,” असंही त्या म्हणाल्या. सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना भारतीय रुपयाबाबत प्रश्न विचारला होता. “भौगोलिक-राजकीय तणावादरम्यान रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे. येणाऱ्या काळात रुपयासाठी तुम्हाला कोणती आव्हाने दिसत आहेत आणि तुम्ही त्यांना कसे सामोरे जाल?” असं एका पत्रकारानं सीतारामन यांना विचारलं.
“सर्वप्रथम, मला रुपयाची घसरण होताना दिसत नाही, पण अमेरिकन डॉलर मजबूत होताना दिसत आहे. डॉलर मजबूत होत आहे. त्यामुळे साहजिकच ज्याच्या तुलनेत हे मजबूत होत आहेत त्या करन्सी कमकुवत होतील. इतर उदयोन्मुख बाजार चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगली कामगिरी करत आहे. मात्र, रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,” असे सीतारामन म्हणाल्या. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. एका डॉलरचे मूल्य 82.42 रुपया इतके झाले आहे.