नवी दिल्ली : बायकोचे तोंड किती वेळ बघाल? रविवारीही कामावर या, ९० तास काम करा, असे विधान लार्सन अँड टुब्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. सुब्रमण्यन यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता त्यावरून उद्योगक्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आपले मत व्यक्त करत आहेत.
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी म्हटले की, किती काम केले याऐवजी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा कारण १० तासांत जग बदलू शकते. माझी बायको अतिशय सुंदर असून, मला तिच्याकडे पहायला आवडते, असे म्हणत त्यांनी सुब्रमण्यन यांना टोला लगावला आहे.
कुटुंब महत्त्वाचे! कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले की, जर तुम्ही कुटुंबासमवेत घरी वेळ घालवत नसाल, तुम्ही मित्रांबरोबर वेळ घालवत नसाल, वाचत नसाल, विचार करत नसाल तर तुम्ही निर्णय घेताना कोणते संदर्भ घेता? उदाहरण देताना ते म्हणाले की, जर कुटुंबासोबत न राहता आपण सर्व वेळ ऑफिसमध्येच घालवला, तर लोकांना कोणती कार हवी हे कसे कळणार?. कुटुंबासोबतही राहण्याची गरज आहे.
‘गुणवत्तेवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे’आठवड्यातून ९० तास काम करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि इतरांबद्दल मला आदर आहे.मला काहीही चुकीचे म्हणायचे नाही, परंतु वाटते की हा वाद चुकीच्या दिशेने जात आहे, कारण ही चर्चा कामाच्या तासांची आहे. ते म्हणाले, किती वेळ काम केले याला महत्त्व नसून, गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे ४० तास, ७० तास किंवा ९० तास महत्त्वाचे ठरत नाहीत. तुम्ही काय रिझल्ट देता हे महत्त्वाचे आहे. अगदी तुम्ही १० तास काम केले तरी १० तासांत जग बदलू शकता.
होय! माझ्या पत्नीला देखील वाटते की, मी एक अद्भुत व्यक्ती आहे आणि तिला रविवारी मला पाहणे आवडते. कामाची गुणवत्ता नेहमी वेळेपेक्षा अधिक महत्त्वाची असते.- अदार पुनावाला, सीईओ, सीरम