महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. सोशल मीडियावर सर्वात सक्रीय उद्योगपती म्हणूनही त्यांची ओळख नेटीझन्सला आहे. ते ट्विटरवर नेहमी सक्रिय असतात आणि त्यांच्या फॉलोअर्स आणि इतर ट्विटर युजर्संनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील देत असतात. दोन दिवसांपूर्वीच्या त्यांच्या एका ट्विटने नेटीझन्सची मने जिंकली होती. त्यावेळी, त्यांनी जगण्यातलं काहीसं तत्त्वज्ञान सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी जगण्यातलं तत्वज्ञान एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. तसेच, हा व्हिडिओ पाहताना मी शेवटपर्यंत येड्यात निघालो, अशी कबुलीही त्यांनी दिली.
आनंद महिंद्रांना एका ट्विटर युजर्सने प्रश्न केला होता की, तुम्ही जगातील ७३ व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात, तुम्ही १ नंबरवर कधी येणार?. दरम्यान, एका फॉलोअर्सने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन आनंद महिंद्रा यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. १० नोव्हेंबरला विचारलेल्या प्रश्नाला आज आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले. त्यांनी संबंधित फॉलोअर्सच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले, "खरं तर हे आहे की मी कधीही सर्वात श्रीमंत होणार नाही. कारण ही माझी इच्छा कधीच नव्हती." यावर इतर ट्विटर युजर्सनी त्यांच्या उत्तराचे कौतुक केले आहे. एका उत्तरातून त्यांनी जीवन जगण्याचं तत्त्वज्ञानच सांगतिलं होतं. आता, पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी जीवनातील तत्त्वज्ञान सांगितलंय.
महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एक विमान उंच आकाशातून जमिनीच्या दिशेने झेपावताना दिसून येते. एका पाण्याच्या टाकीवरुन हे विमान उडताना दिसते. या विमानाचे डिझाईन पाहून कुणालाही ते विमान खरोखरीचं आहे, असेच वाटेल. मात्र, पुढील काही सेकंदातच एका घरावर उभारलेला मुलगा अलगदपणे ते विमान आपल्या हातात सामावून घेतो. त्यामुळे, आपण मुर्खात निघाल्याची भावना आपली होते अन् आपण सहजपणे हसतोही. आनंद महिंद्रांच्या बाबतीतही असंच घडलंय. त्यामुळेच, त्यांनी व्हिडिओ ट्विट करत, मी शेवटपर्यंत वेड्यात निघालो, असं म्हटलंय. यावरुन एक गोष्ट लक्षात घेता येईल, आपल्या अडचणी किरकोळ असतात, पण त्यांना अधिक मोठं समजून घाबरतो. या समस्यांचं मूळ हे आपल्याकडेच असते, असे साधं तत्त्वज्ञान महिंद्रा यांनी मांडलं आहे. तसेच, सोमवारचं प्रेरणादायी असा हॅशटॅगही त्यांनी वापरलाय.