Zomato Deepinder Goyal : तुम्ही अनेकदा ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो किंवा स्विगीवरून काहीतरी खायला मागवलंच असेल. फूड डिलिव्हरी बॉईजना अनेकदा उन्हा-तान्हात, पावसामध्ये खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी जावं लागतं. दरम्यान, डिलिव्हरी पार्टनर्सना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं याची प्रचिती खुद्द झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांना आली. त्यांनी एक दिवस डिलिव्हरी पार्टनर एजंट म्हणून काम केलं. यावेळी आलेला अनुभव त्यांनी शेअर केला. मॉल्सनी डिलिव्हरी पार्टनर्सबद्दल अधिक माणुसकी बाळगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
गोयल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरून एक व्हिडिओ पोस्ट करत डिलिव्हरी बॉय बनण्याचा अनुभव शेअर केला आहे. "माझ्या दुसऱ्या ऑर्डरदरम्यान मला जाणवले की आम्हाला सर्व डिलिव्हरी पार्टनर्सची कामाची परिस्थिती सुधारण्यासाठी मॉलबरोबर जवळून काम करण्याची आवश्यकता आहे. मॉल्सनी डिलिव्हरी पार्टनर्सबद्दल अधिक माणुसकी बाळगणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं?" असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय.
मुख्य दरवाज्यातून प्रवेश नाकारला
व्हिडिओमध्ये झोमॅटोचे सीईओ डिलिव्हरी बॉयच्या वेशात मॉलच्या प्रवेशद्वारावर जाताना दिसत आहेत. "आम्ही हल्दीरामकडून ऑर्डर घेण्यासाठी गुरुग्राममधील अँबियंस मॉलमध्ये पोहोचलो. आम्हाला दुसऱ्या प्रवेशद्वारातून जाण्यास सांगण्यात आलं, परंतु नंतर आमच्या लक्षात आले की ते मला पायऱ्या चढून जाण्यास सांगत आहेत. डिलिव्हरी पार्टनरसाठी लिफ्ट नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही पुन्हा मेन गेटमधून आत गेलो," असं गोयल म्हणाले.
During my second order, I realised that we need to work with malls more closely to improve working conditions for all delivery partners. And malls also need to be more humane to delivery partners.
— Deepinder Goyal (@deepigoyal) October 6, 2024
What do you think? pic.twitter.com/vgccgyH8oE
पायऱ्या चढून तिसऱ्या मजल्यावर गेले आणि त्यांना डिलिव्हरी पार्टनर्स मॉलमध्ये एन्ट्री करू शकत नाहीत आणि त्यांना ऑर्डर घेण्यासाठी पायऱ्यांवर थांबावं लागतं असं आढळून आलं. माझ्या सहकाऱ्यांसोबत काही क्षण घालवले आणि त्यांच्याकडून काही गोष्टीही समजल्या. जेव्हा सिक्युरिटी गार्ड तिकडून निघून गेले तेव्हा आपल्याला ऑर्डर घेता आली, असंही ते म्हणाले. त्यांनी आपला अनुभव शेअर करत एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.