Join us

सुखोई-३० MKI विमानांसाठी भारतातच तयार होणार इंजिन; HAL ला मिळाली २६ हजार कोटी रुपयांची ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 10:18 AM

IAF Sukhoi-30MKI Engine : HAL वर्षभरानंतर या इंजिनांची डिलिव्हरी सुरू करेल.

IAF Sukhoi-30MKI Engine : सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानांचे इंजिन आता भारतातच तयार होणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने (सुरक्षा) २६ हजार कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी दिली आहे. हे एरो-इंजिन संरक्षण PSU हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे बनवले जाईल. HAL कडून २४० एरो-इंजिन खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. HAL वर्षभरानंतर या इंजिनांची डिलिव्हरी सुरू करेल. तसेच, सर्व इंजिनांची डिलिव्हरी आठ वर्षांत पूर्ण करायची आहे.

दरम्यान, HAL कडून २४० इंजिन खरेदी केल्याने भारतीय हवाई दलाला (IAF) नवीन ताकद मिळेल. चीन आणि पाकिस्तानच्या दुहेरी आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलाला किमान ४२ फायटर स्क्वॉड्रन्सची गरज आहे, परंतु सध्या भारतीय हवाई दलाकडे फक्त ३० उपलब्ध आहेत. HAL जे इंजिन बनवेल, त्याचे काही पार्ट रशियामधून येतील. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'या एरो-इंजिनमध्ये ५४ टक्क्यांहून अधिक स्वदेशी मटेरिअल असणार आहे. हे इंजिन HALच्या कोरापुट विभागात तयार केले जातील.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सध्या २५९ सुखोई आहेत. यापैकी बहुतेक रशियन परवान्याखाली HAL ने बनवले आहेत. ही लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाच्या फायर पॉवरचा महत्त्वाचा भाग आहेत. इतर उपकरणांनी सुसज्ज असलेल्या १२ नवीन सुखोईची ऑर्डरही दिली जात आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) फेब्रुवारीमध्ये जवळपास ६० मिग-२९ विमानांच्या ताफ्यासाठी नवीन इंजिन खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. दरम्यान, HAL रशियाच्या मदतीने ५,३०० कोटी रुपयांमध्ये ही इंजिने बनवणार आहे. तसेच, सुखोई लढाऊ विमानांमध्ये आणखी स्वदेशी अपग्रेड जोडण्याची तयारी सुरू आहे.

टॅग्स :भारतीय हवाई दलव्यवसाय