Join us

मुंबई बाजार समितीवर आयएएस!

By admin | Published: August 17, 2016 4:20 AM

मुंबई आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर आयएएस दर्जाचा अधिकारी नेमण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी

मुंबई : मुंबई आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर आयएएस दर्जाचा अधिकारी नेमण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज लोकमतला ही माहिती दिली. शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या या बाजार समित्यांचा कारभार गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी आयएएस अधिकाऱ्याची गरज असल्याची भूमिका आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आजच मांडली, असे देशमुख म्हणाले. आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलसंपदा विभागात आयएएस अधिकाऱ्याची सचिव म्हणून नेमणूक केली होती. भाजपाचे सरकार आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात सचिवपदावर आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करणे सुरू झाले. अर्थात दोन सचिवांपैकी एक आयएएस आणि दुसरे पदोन्नतीने विभागातूनच आलेल्या अधिकाऱ्यास सचिवपद देण्यात आले. देशमुख यांनी सांगितले की १० कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बाजार समित्यांवर सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची सचिव म्हणून नियुक्ती केली जाईल. बाजार समित्यांचे संचालक आणि सचिवांचे साटेलोटे असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी समोर येतात. या प्रवृत्तीला आळा बसविण्यासाठीच आता ज्येष्ठ अधिकाऱ्यांना बाजार समित्यांमध्ये आणून बसविले जाईल, असे म्हटले जाते. बाजार समित्यांच्या कारभार अधिक लोकाभिमुख व्हावा यासाठी या समित्यांमध्ये कृषी माल देणाऱ्या प्रत्येक सभासदाला सदस्य करुन घेण्याचा विचार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)