नवी दिल्ली : ट्विटर, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलनंतर आता आयबीएम (IBM) कंपनी सुद्धा कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. सुमारे 3900 कर्मचाऱ्यांना कर्मचारी कपातीचा सामना करावा लागणार आहे. अशी माहिती कंपनीने दिली आहे. गेल्या बुधवारी, IBM कॉर्पोरेशनने नोकरीच्या कपातीची माहिती दिली होती. मात्र, कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे कारणही कंपनीने दिले आहे.
आयबीएमचे मुख्य वित्तीय अधिकारी जेम्स कॅव्हनॉफ म्हणाले की, कंपनीला जानेवारी ते मार्च दरम्यान कर्मचारी कपातीमुळे 300 मिलियन डॉलरचा शुल्क भरावा लागणार आहे. रेव्हेन्यू कॉल दरम्यान, कंपनीने सांगितले की, आम्ही गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाच्या कृती केल्या आहेत, ज्यामुळे आमच्या व्यवसायात काही अडकलेले खर्च आले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्येही 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
2022 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने 16.7 बिलियन डॉलर रेव्हेन्यू , 3.8 बिलियन डॉलरचे ऑपरेटिंग प्री-टॅक्स इन्कम आणि 3.60 डॉलर प्रति शेअर ऑपरेटिंग इन्कम मिळवले. आयबीएमचे अध्यक्ष अरविंद कृष्णा म्हणाले की, सॉफ्टवेअर पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी आम्ही हायब्रिड क्लाउड आणि एआय क्षमतांमध्ये गुंतवणूक केली आहे. दरम्यान, आयबीएमपूर्वी कर्मचार्यांच्या कपातीमध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. मात्र, यातील बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे कारण आर्थिक मंदीची भीती असल्याचे सांगितले आहे.
3 कंपन्यांनी 40,000 कर्मचार्यांची केली कपात
या वर्षाच्या सुरुवातीपासून केवळ 3 टेक कंपन्यांनी मिळून सुमारे 40,000 लोकांना बेरोजगार केले आहे. Amazon ने 18,000 लोकांना काढून टाकले आहे, Microsoft ने 10,000 आणि Google ने 12,000 लोकांना कामावरून काढले आहे. याशिवाय अनेक टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. 2023 मध्ये अमेरिकेसह संपूर्ण जग मंदीच्या गर्तेत आहे. अशा परिस्थितीत 2022 सालापासूनच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली होती. यामध्ये ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, फेसबुकची मूळ कंपनी मेटा अशा अनेक बड्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.