नवी दिल्ली : वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अचानक धोरणात्मक दरात बदल केला. यानंतर अनेक बँकांनी रेपो दर आधारित व्याजदर (EBLR) वाढवले आहेत. आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) हे वाढवून 8.10 टक्के आणि बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) 6.90 टक्के केले आहे.
बँक ऑफ इंडिया (Bank of Baroda) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांनीही रेपो दरात वाढ केल्यानंतर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करून 4.40 टक्के करण्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांनी हा निर्णय घेतला आहे.
महाग होणार कर्ज...ईबीएलआरमध्ये (EBLR) वाढ झाल्यामुळे ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि गृहकर्ज महाग होतील. आयसीआयसीआय बँकेने सांगितले की, 'रेपो दरासोबत आयसीआयसीआय-ईबीएलआर बदलला जात आहे. तो आता 8.10 टक्के होईल. त्याची अंमलबजावणी 4 मे पासून करण्यात आली.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदानेही (Bank of Baroda) व्याजदरात बदल केला आहे. बँकेकडून असे सांगण्यात आले की, 'किरकोळ कर्जासाठी लागू असलेला बीआरएलएलआर (BRLLR) 5 मे 2022 पासून 6.90 टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचा 4.40 टक्के रेपो दर आणि 2.50 टक्के 'मार्कअप' समाविष्ट आहे.
बँक ऑफ इंडियाने (Bank of India) 5 मे 2022 पासून रेपो दरात बदल करून आरबीएलआर (RBLR) 7.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सेंट्रल बँकेनेही आरबीएलआर (RBLR) 0.40 टक्क्यांनी वाढवून 7.25 टक्के केले आहे.