नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. दरम्यान, एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) गेल्या काही दिवसांत फिक्स्ड डिपॉझिटवरील (Fixed Deposit) व्याजदरात वाढ केल्यानंतर आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदर वाढवले आहेत.
नवीन दर आजपासून लागू
बँकेने व्याजदरात (Interest Rate) 5-10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. 22 मार्चपासून नवे दर लागू झाले आहेत. व्याजदर वाढीचा फायदा 2 ते 5 कोटी रुपयांच्या ठेवींवर मिळणार आहे. बँकेने एक वर्ष ते दोन वर्षांच्या मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले आहेत. बँकेने उर्वरित फिक्स्ड डिपॉझिटचे दर बदललेले नाहीत.
फिक्स्ड डिपॉझिटवरील 'हे' नवीन दर
एक वर्ष ते 389 दिवस आणि 390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 4.15 टक्के व्याज मिळेल. यापूर्वी या कालावधीसाठी 4.05 टक्के व्याज मिळत होते. त्याचप्रमाणे, 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 4.20 टक्के व्याज मिळेल. या मुदतीवर पूर्वी 4.10 टक्के व्याज मिळत होते.
2 वर्षांपेक्षा कमी कालावधीवर 4.30 टक्के व्याज
याशिवाय, बँकेकडून 18 महिन्यांपेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजदर 4.30 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो 4.25 टक्के होते. आयसीआयसीआय बँकेने उर्वरित मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
जास्त कालावधीच्या ठेवींवर व्याजदर
आयसीआयसीआय बँक 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे आणि 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 4.6% व्याज दर देत आहे. दरम्यान, 271 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिटवर 3.70 टक्के व्याजदर आहे.