ICICI बँक कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ICICI बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सोमवारी मोठा दिलासा दिला आहे. चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला न्यायालयाने १-१ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या अटकेवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच ही अटक नियमानुसार झाली नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
अमित देसाई आणि कुशल मोर यांनी न्यायालयासमोर चंदा कोचर यांची बाजू मांडली. त्यांच्या पतीच्या व्यवसायात काय सुरू होते हे त्यांना माहित नव्हते. चंदा कोचर यांना एका पुरुष अधिकाऱ्याने अटक केली. त्या ठिकाणी कोणतीही महिला अधिकारी उपस्थित नव्हती हे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. हे नियमांविरुद्ध आहे, असे वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले.
नेमके प्रकरण काय?आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन संबंधी दिलेल्या कर्ज घोटाळ्यात ईडीने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केलेले आहे. बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, कंपनीचे वेणुगोपाल धूत यांचे आरोपपत्रात नाव आहे. दीपक कोचर हे व्हिडिओकॉनची उपकंपनी असलेल्या न्यू पॉवर या कंपनीचे संचालक होते. ही कंपनी केवळ कागदोपत्री होती. चंदा कोचर यांनी या कंपनीला १८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले, पुढे ते कर्ज बुडीत खात्यात गेले. याप्रकरणी ईडीने २०१८ पर्यंत चौकशी केली होती. यानंतर ईडीने धूत व कोचर दाम्पत्याविरोधात पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या कारवाईनंतर व्हिडिओकॉनच्या मालमत्तांवर सीबीआयने देखील गुन्हा दाखल करत छापे टाकले होते.