देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या ICICI बँकेच्या सर्व्हरमध्ये शुक्रवारी दुपारी समस्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना नेट बँकिंग ते मोबाईल अॅप वापरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय बँकेच्या ऑनलाइन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आयसीआयसीआय डायरेक्टची वेबसाइटही डाउन झाली आहे.
बँकेचे ग्राहक नेट बँकिंगसाठी लॉग इन करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना एरर मेसेज दाखवत आहे. 'तुम्ही ज्या पेजला भेट देण्याचा प्रयत्न करत आहात ते सध्या उपलब्ध नाही. तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत', असा मेसेज ग्राहकांना नेट बँकिंग करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे, ग्राहकांना बँकेच्या मोबाइल अॅप iMobilePay मध्ये लॉग इन करण्यातही अडचणी आल्या आहेत.
आयसीआयसीआय डायरेक्टच्या ट्विटर हँडलवरूनही ही माहिती देण्यात आली आहे. "प्रिय ग्राहकांनो, icicidirect.com सध्या बंद आहे. परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सेवा पूर्ववत होताच आम्ही तुम्हाला येथे अपडेट करू. तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत", असं ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटला एक तासाहून अधिक काळ लोटला असून अद्यापही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही.
Dear Customer, https://t.co/nUHcQlzYQi is down at the moment. We are working to get things back to normal as quick as possible and will update you here. We deeply regret the inconvenience caused.
— ICICIdirect (@ICICI_Direct) March 25, 2022