मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना कायमची सुट्टी मिळण्याची दाट शक्यता आहे. कोचर यांना अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी घेतल्यानंतर त्यांची पुनर्नियुक्ती मात्र संकटात आहे.पती दीपक व दीर राजीव कोचर यांच्या नूपॉवर कंपनीच्या माध्यमातून व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप अरविंद गुप्ता यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयने राजीव कोचर यांची कसून चौकशी केली. कोचर यांच्यावरील आरोपांचा गांभीर्याने विचार करण्याचा सल्लाही ‘सेबी’ने दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर बँकेने समितीकडून अंतर्गत चौकशी सुरू केली. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी घेतला. पण ही सक्तीची रजा कायमची ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कोचर यांना रजेवर पाठविताना बँकेने आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सचे सीईओ संदीप बक्षी यांची बँकेचे सीओओ म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्ती केली. त्यात कोचर यांचा सध्याचा कार्यकाळ मार्च २०१९ ला संपत आहे. तोपर्यंत चौकशी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. यामुळेच कोचर यांच्यासाठी ही सुट्टी कायम ठरण्याची शक्यता आहे.
आयसीआयसीआय बँकेची कोचरना कायमची सुट्टी?, संदीप बक्षींची नियुक्ती पाच वर्षांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:40 AM