IDBI bank share price: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आयडीबीआय बँकेच्या शेअर्समध्ये वादळी वाढ पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) आयडीबीआय बँकेतील बहुसंख्य हिस्स्यासाठी ३ संभाव्य बोलीदारांना मंजुरी दिल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या. यानंतर कामकजादरम्यान बीएसईवर आयडीबीआय बँकेचा शेअर ३ टक्क्यांनी वधारून १०२.७५ रुपयांवर पोहोचला. दिवसभरात ९७.५० रुपयांच्या नीचांकी पातळीवरून हा शेअर ५ टक्क्यांनी सावरला आहे. २९ जुलै रोजी तो ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर १०७.९८ रुपयांवर पोहोचला होता.
कॅलेंडर वर्ष २०१४ मध्ये आतापर्यंत आयडीबीआय बँकेच्या शेअरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आयडीबीआय बँक विक्रीसंबंधी माहिती असलेल्या लोकांच्या मते, फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज, एमिरेट्स एनबीडी आणि कोटक महिंद्रा बँक लिमिटेड या खरेदीदारांच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
किती हिस्सा विकला जाणार
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसीसह आयडीबीआय बँकेतील सुमारे ६१ टक्के हिस्सा विकण्याचा सरकारचा विचार आहे. यात केंद्र सरकारचा ३०.४८ टक्के आणि एलआयसी ३०.२४ टक्के हिस्सा विकला जाणार आहे. आयडीबीआय बँकेत सरकार आणि एलआयसीचा संयुक्तपणे ९४.७२ टक्के हिस्सा आहे. पण हिस्सा विकल्यानंतर तो ३४ टक्क्यांपर्यंत खाली येईल. सरकारनं चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून आणि असेट मॉनिटायझेशनच्या माध्यमातून ५०,००० कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट ठेवलं आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)